Tarun Bharat

नदाल, अल्कारेझ, स्वायटेक, कॉलिन्स तिसऱया फेरीत

बेन्सिक, साबालेन्का, क्विटोव्हा, प्लिस्कोव्हा, मुगुरुझा, ब्रूक्सबी, रुबलेव्ह, शॅपोव्हॅलोव्ह यांचीही आगेकूच

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

स्पेनचा राफेल नदाल, फ्रान्सचा रिचर्ड गॅस्केट, कार्लेस अल्कारेझ, आंद्रे रुबलेव, डेनिस शॅपोव्हॅलोव्ह, महिलांमध्ये पोलंडची इगा स्वायटेक, डॅनियली कॉलिन्स, आर्यना साबालेन्का, बेलिंडा बेन्सिक, लॉरेन डेव्हिस, पेत्र क्विटोव्हा, कॅरोलिन प्लिस्कोव्हा, गार्बिन मुगुरुझा यांनी अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या तिसऱया फेरीत प्रवेश मिळविला. महिला दुहेरीत सेरेना व व्हीनस या विल्यम्स भगिनींना पहिल्या फेरीतच पराभव स्वीकारावा लागला. ग्रिगोर डिमिट्रोव्ह, स्लोअन स्टीफेन्स यांचे आव्हानही समाप्त झाले.

राफेल नदालला इटलीच्या फॅबिओ फॉगनिनीविरुद्ध एक सेट गमवावा लागला. याशिवाय त्याला स्वताचीच रॅकेट लागून दुखापतही झाली होती, अशा स्थितीत त्याने जोरदार मुसंडी मारत चार सेट्सच्या लढतीत 2-6, 6-4, 6-2, 6-1 असा विजय मिळवित तिसरी फेरी गाठली. परतीचा फटका मारतेवेळी त्याची रॅकेट त्याच्याच नाकाला जोरात आदळली आणि त्याच्या नाकातून रक्त येऊ लागले. लगेचच बाजूला येऊन तो पाठीवर झोपला आणि त्यावर उपचार करवून घेतले. नाकावर रॅकेट आदळल्यानंतर जोरात कळ आली आणि हलकीशी भोवळही आली, असे त्याने नंतर सांगितले. त्याची पुढील लढत रिचर्ड गॅस्केटशी होणार आहे.

36 वर्षीय रिचर्ड गॅस्केटने तिसरी फेरी गाठताना क्रोएशियाच्या एम. पेसमानोविकवर 6-2, 6-4, 4-6, 6-4 अशी मात केली तर ग्रिगोर डिमिट्रोव्हला अमेरिकेच्या ब्रँडन नाकाशिमाकडून 7-6, 7-5, 6-3 असा पराभव स्वीकारावा लागला. 19 वर्षीय कार्लोस अल्कारेझने अर्जेन्टिनाच्या फेडरिको कॉरियाचा 6-2, 6-2, 7-5 असा पराभव करून तिसरी फेरी गाठली. त्याची पुढील लढत ब्रूक्सबीविरुद्ध होणार आहे. ब्रूक्सबीने सिनसिनॅटी ओपन चॅम्पियन व 25 वा मानांकित बोर्ना कोरिकवर 6-4, 7-6 (12-10), 6-1 अशी मात केली. यातील दुसऱया सेटमध्ये कॅलिफोर्नियाच्या ब्रूक्सबीने दुसऱया सेटमध्ये सात सेट पॉईंट्स वाचवत हा विजय मिळविला. अन्य लढतीत रशियाच्या नवव्या मानांकित आंद्रे रुबलेव्हने एस.क्वॉनचा 6-3, 6-0, 6-4, 19 व्या मानांकित कॅनडाच्या शॅपोव्हॅलोव्हने आर. कार्बालेस बाएनाचा 6-4, 4-6, 6-3, 6-2 असा पराभव करून आगेकूच केली.

स्वायटेक, कॉलिन्स विजयी

महिला एकेरीत जागतिक अग्रमानांकित इगा स्वायटेकने अमेरिकेच्या स्लोअन स्टीफेन्सचा 6-3, 6-2, असा पराभव करून तिसरी फेरी गाठली. 2017 मध्ये स्टीफेन्सने ही स्पर्धा जिंकली होती. अन्य लढतीत डॅनियली कॉलिन्सने सी. बुस्काचा 6-2, 7-5, कॅरोलिना प्लिस्कोव्हाने बुझकोव्हाचा 6-3, 6-2, सहाव्या मानांकित साबालेन्काने काया कॅनेपीचा 2-6, 7-6 (10-8), 6-4, नवव्या मानांकित मुगुरुझाने प्रुहव्हर्टोव्हाचा 6-0, 6-4, ऍलिझ कॉर्नेटने सिनियाकोव्हाचा 6-1, 1-6, 6-3, लॉरा डेव्हिसने एकतेरिना अलेक्झांड्रोव्हाचा 0-6, 6-4, 7-6 (10-5), तेराव्या मानांकित बेलिंडा बेन्सिकने सोरेना सिर्स्टियाचा 3-6, 7-5, 6-2 असा पराभव करून तिसऱया फेरीत स्थान मिळविले. याशिवाय ए. कॅलिनिनाने माघार घेतल्यामुळे पेत्र क्विटोव्हाला पुढे चाल मिळाली.

विल्यम्स भगिनी पहिल्याच फेरीत पराभूत

महिलांच्या दुहेरीत सेरेना व व्हीनस या विल्यम्स भगिनींना पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. सेरेनाची आणि कदाचित व्हीनसची देखील ही शेवटची ग्रँडस्लॅम असल्याचे मानत चाहत्यांनी या सामन्याला मोठी गर्दी केली होती. पण या भगिनींना विजय मिळविण्यात अपयश आले. झेक प्रजासत्ताकच्या ल्युसी ऱहॅडेका व लिंडा नोस्कोव्हा यांनी विल्यम्स भगिनींना 7-6 (7-5), 6-4 असे नमवित दुसरी फेरी गाठली. कोर्ट सोडून जाताना या महिला दुहेरीतील एका महान जोडीला प्रेक्षकांनी उभे राहून मानवंदना दिली.

Related Stories

सेरेनाची लढत व्हिनसबरोबर

Patil_p

बीएआयकडून बॅडमिंटनपटूंना बक्षीस प्रदान

Patil_p

इस्ट बंगाल संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी रिव्हेरा

Patil_p

सुपर ओव्हरमध्ये झारखंडचा विजय

Patil_p

तीन दशकानंतर सनीकडून म्हाडाचा भूखंड परत

Patil_p

चेल्सी महिला फुटबॉल संघ विजेता

Patil_p