वृत्तसंस्था/ बार्सिलोना
मेलबर्न येथे जानेवारी महिन्यात होणाऱया 2023 च्या टेनिस हंगामातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेसाठी स्पेनचा माजी टॉप सिडेड राफेल नदाल पुरुष एकेरीचे जेतेपद पुन्हा स्वतःकडे राखण्यासाठी सज्ज झाला आहे.
राफेल नदालला 2022 चा टेनिस हंगाम म्हणावा तसा यशस्वी गेला नाही. या कालावधीत 36 वर्षीय नदालला वारंवार दुखापती समस्यांनी दमविले होते. गेल्या काही दिवसांपासून नदाल आता नव्या टेनिस हंगामासाठी सरावावर भर देत आहे. नदालने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत विक्रमी 22 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. नदालला आता त्याच्या प्रशिक्षक वर्गातील अर्जेंटिनाचा माजी टेनिसपटू गस्टेव्ह मार्कासिओचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे. नदाल आता येत्या सोमवारी सिडनीला रवाना होणार आहे. सिडनीमध्ये युनायटेड चषक मिश्र टेनिस स्पर्धा होणार असून या स्पर्धेत तो सहभागी होणार आहे. ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेपूर्वीची ही शेवटची सरावाची स्पर्धा आहे.