वृत्तसंस्था/ माद्रीद
स्पेनचा अव्वल टेनिसपटू राफेल नदालचे तब्बल चार आठवडय़ाच्या विश्रांतीनंतर टेनिस सरावामध्ये पुनरागमन झाले आहे. पाठीच्या मणक्याला झालेल्या दुखापतीमुळे नदाल एक महिना टेनिस क्षेत्रापासून अलिप्त होता.
प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेला एक महिन्याचा कालावधी राहिला असून नदालने या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी आपल्या सरावाला प्रारंभ केला आहे. एटीपीच्या क्रमवारीत नदाल सध्या चौथ्या स्थानावर आहे. 22 मार्च रोजी इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत नदालला अमेरिकेच्या फ्रीट्जकडून पराभव पत्करावा लागला होता. या स्पर्धेवेळी त्याला वरील दुखापतीचा त्रास जाणवत होता. 35 वर्षीय नदालने माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत तसेच सध्या सुरू असलेल्या बार्सिलोना खुल्या टेनिस स्पर्धेत आपला सहभाग दर्शविलेला नाही. दरम्यान 1 ते 8 मे या कालावधीत होणाऱया माद्रीद मास्टर्स टेनिस स्पर्धेत तो खेळण्याचा विचार करीत आहे. 22 मे पासून सुरू होणाऱया पेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेसाठी नदालने आपल्या तंदुरूस्तीला अधिक महत्त्व दिले आहे. नदालने आतापर्यंत 13 वेळा प्रेंच ग्रॅण्डस्लॅम जिंकली असून त्याने विक्रमी 21 ग्रॅण्डस्लॅम अजिंक्यपदांचा नवा टप्पा गाठला आहे. सर्बियाचा जोकोविच आणि स्वीसचा रॉजर फेडरर यांनी आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत समान 20 ग्रॅण्डस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत.