वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
14 वर्षांखालील वयोगटाच्या मुलांसाठी येथे सुरू असलेल्या 61 व्या सुब्रतो चषक शालेय फुटबॉल स्पर्धेत नागालँड, मणिपूर, चंदीगड आणि झारखंड यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.
या स्पर्धेतील झालेल्या सकाळच्या सत्रातील उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या सामन्यात नागालँड दिमापूरच्या ग्रीनवूड स्कूलने आसामच्या मिंगमांग नेलबरी हायस्कूलचा 7-0 असा दणदणीत पराभव करत उपांत्य फेरी गाठली. या सामन्यात नागालँड संघातर्फे येलासिलीने शानदार हॅटट्रिक नोंदविली. दुसऱया एका सामन्यात इम्फाळ मणिपूरच्या हेरोक हायर सेकंडरी स्कूलने केरळच्या नेस चिलेम्ब्रा स्कूलचा 6-0 असा पराभव करत शेवटच्या चार संघात स्थान मिळविले. आंबेडकर स्टेडियमवर झालेल्या तिसऱया सामन्यात चंदीगडच्या शासकीय मॉडेल हायस्कूलने शासकीय चेवांगफिंगा मिडल स्कूलचा 1-0 असा निसटता पराभव केला. विजयी संघातर्फे एकमेव गोल टिनेसने केला. चौथ्या आणि शेवटच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात झारखंडच्या बेरवे हायस्कूल चेनपूरने मेघालयाच्या सेकंडरी स्कूलचा 1-0 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. या सामन्यातील एकमेव विजयी गोल नवव्या मिनिटाला झारखंडच्या समीर सोरेनने केला. आता या स्पर्धेत नागालँड आणि मणिपूर तसेच चंदीगड व झारखंड यांच्यातील उपांत्य लढती मंगळवार दि. 13 सप्टेबरला होणार आहेत.