Tarun Bharat

नागवा – हडफडे येथे युवकावर खुनीहल्ला

Advertisements

तरुण गंभीर जखमी व्यावसायिक वादातून हल्ला

प्रतिनिधी/ म्हापसा

नागवा – हडफडे येथे शनिवारी पहाटे दोन गटात झालेल्या भांडणात नाईकवाडा – कळंगूट येथील रहिवासी रवी शिरोडकर यांच्यावर प्राणघातक सुरीहल्ला करण्यात आला. रक्तबंबाळ अवस्थेत रवीला त्वरित म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी गोमेकॉत पाठविले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या खुनी हल्ल्याप्रकरणी संशयित मुख्य आरोपी टारझन पार्सेकर याच्यावर व इतर साथीदारांवर गुन्हा नोंद केला आहे. व्यावसायिक वादातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात आले. हल्ल्याच्यावेळी सर्वजण दारुच्या नशेत होते, अशी माहिती हणजूण पोलिसांनी दिली. या प्रकरणी संशयितांना पकडून पोलीस स्थानकात आणून जबानी घेत असताना दोघांनी पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

विभागीय पोलीस उपअधीक्षक जीवबा दळबी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना शनिवारी पहाटे घडली. दारुच्या नशेत तरुणांनी हडफडे येथे रस्त्यावर हाणामारी केली. प्रथम शाब्दिक चकमक होऊन नंतर त्याचे हाणामारीत रुपांतर झाले. हाणामारीत टारझन पार्सेकर याने रवी शिरोडकरच्या पोटात सुरा खुपसला व नतर शरीरावर अनेक वार केले. घटनेची माहिती पोलीस व 108 रुग्णवाहिकेला दिल्यावर रवीला त्वरित म्हापसा जिल्हा इस्पितळात नेण्यात आले. तेथील डय़ुटीवरील डॉक्टरांनी प्रथमोपचार करुन गोमेकॉत पाठविले. रवीच्या अंगावर अनेक ठिकाणी चाकू हल्ला केल्याने लगेच शस्त्रक्रिया करण्यात आली असली तरी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

संशयित टारझन पार्सेकरला घेतले ताब्यात

घटनेची माहिती मिळताच हणजूण पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रशल देसाई, उपनिरीक्षक तेजसकुमार यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व जखमी रवी शिरोडकरला उपचारासाठी इस्पितळात पाठविले. तेथे उपस्थित अन्य सहा जणांनी रवीवर टारझन पार्सेकर याने खुनीहल्ला केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्वरित पार्सेकर याला ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे.

उपअधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी व पोलिसांना मार्गदर्शन

दरम्यान, सायंकाळी ठसेतज्ञ तसेच मोबाईल व्हॅनच्या पथकाने घटनास्थळी जाऊन तपासणी केली. घटनास्थळी सांडलेल्या रक्ताचे नमुने गोळा केले. उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी सायंकाळी घटनास्थळी येऊन पाहणी केली तसेच हणजूण पोलीस निरीक्षक प्रशल देसाई व इतरांना मार्गदर्शन केले. टारझन पार्सेकर हा अट्टल गुन्हेगार असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. कळंगूट पोलीस स्थानकात यापूर्वी त्याच्या विरुद्ध गुन्हे नोंद आहेत.

जबानी घेताना दोघांचा पलायनाचा प्रयत्न

हणजूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्लाप्रकरणी पोलीस स्थानकात चौकशीसाठी आणलेल्या दोघा तरुणांनी जबानी घेत असताना तेथून पळ काढला. उपनिरीक्षक तेजसकुमार व इतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन सुमारे 100 मीटरवर त्यांना जेरबंद केले.

हा हल्ला कट रचून केला ः उदय शिरोडकर

रवीचे चुलत बंधू उदय शिरोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खुनी हल्ला कट रचून केला आहे. आम्ही कुटुंबीय नातेवाईकाच्या वाढदिवसासाठी गेलो होतो. त्यावेळी रात्री रवीला दोनवेळा फोन आला. संशयितांनी त्याला रात्री 3 वा. हडफडे येथे बोलविले असता टारझन, लुडू, सागर व इतरांनी मिळून रवीवर खुनी हल्ला केल्याची माहिती उदय यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मारहाणीचे कारण अद्याप समजले नसून इनोव्हा, बलेनो गाडीने सुमारे 12 जण मारहाण करण्यासाठी आले होते, असे सांगण्यात आले.

संशयितांवर कारवाईसाठी ग्रामस्थांची आमदार लोबोंकडे धाव

कळंगूट ग्रामस्थांनी आमदार मायकल लोबो यांची निवासस्थानी भेट घेऊन रवी शिरोडकर हल्लाप्रकरणी सर्व संशयित आरोपींना गजाआड करण्यास पोलिसांनी सांगावे तसेच या घटनेची निःपक्षपातीपणे चौकशी करावी व न्याय देण्याची मागणी केली. टारझन पार्सेकर याने कळंगूटमध्ये दहशत पसरवली असून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Related Stories

प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण करा

Amit Kulkarni

ग्रामपंचायतींवर प्रशासकराज!

Amit Kulkarni

उद्योजक दामोदर कोरगावकर यांचे निधन

Amit Kulkarni

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 14, 15 रोजी गोवा दौऱयावर

Amit Kulkarni

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

Amit Kulkarni

काणकोणात भटक्या जनावरांची समस्या जटील

Patil_p
error: Content is protected !!