म. ए. युवा समितीची स्वाक्षरी मोहीम
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव रेल्वेस्थानकाला ‘छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानक’ असे नाव द्या, या मागणीसाठी म. ए. युवा समितीने सोमवारी शिवजयंतीचे औचित्य साधून स्वाक्षरी मोहीम राबविली. शिवजयंतीसाठी येणाऱया प्रत्येक शिवभक्ताने यावर स्वाक्षरी केल्या असून ही पत्रे केंदीय रेल्वेमंत्री व रेल्वे राज्यमंत्र्यांना पाठविली जाणार आहेत.
रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण केले जात असून, या रेल्वेस्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी शिवभक्तांकडून केली जात आहे. मराठा लाईट इन्फंट्री छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानून काम करते. 1922 साली इन्फंट्रीचे मुख्यालय बेळगावमध्ये सुरू झाले. याला 100 वर्षे पूर्ण झाल्याने रेल्वेस्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी युवा समितीने यापूर्वी निवेदनाद्वारे केली होती. सोमवारी शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यान, नरगुंदकर भावे चौक येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. शेकडो शिवभक्तांनी यावर स्वाक्षऱया केल्या. स्वाक्षरीचे पत्र केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पाठविले जाणार असल्याचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी सांगितले. यावेळी युवा समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.