प्रतिनिधी /शिरोडा
टॉपकोला बोरी ते शिरशिरे बोरी या रस्त्याला बोरी गावचे सुपुत्र व प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ स्व. मंजुनाथ देसाई यांचे नाव देण्यात आले आहे. नुकताच हा नामकरण सोहळा पार पडला. यावेळी शिक्षणतज्ञ मिनानाथ उपाध्ये, बोरी पंचायतीच्या सरपंच ज्योती मुकेश नाईक, उपसरपंच दीपिका नाईक, स्थानिक पंचसदस्य विनय पारपती, रूपाली नाईक, रामदास गावडे, फिलोमिना वाझ, श्री. केंकरे व निवृत्त अभियंते संजय भट बोरकर आदी उपस्थित होते.
डॉ. देसाई यांचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले होते. यावेळी बोरी ग्रामस्थ व त्यांच्या चाहत्यांतर्फे आयोजित केलेल्या शोकसभेत डॉ. देसाई यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्याचे स्मरण म्हणून टॉपकोला ते शिरशिरे बोरी रस्त्याचे डॉ. मंजुनाथ देसाई असे नामकरण करण्याचा ठराव एकमताने संमत झाला होता. ज्या बांबोळी येथील गोमेकॉत डॉ. देसाई यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले तेथील हृदयरोग चिकित्सा विभागाला डॉ. देसाई यांचे नाव देण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र हे नामकरण अद्याप झालेले नाही.
डॉ. मंजुनाथ देसाई यांना अल्पायुष्य लाभले. मात्र त्यांनी आयुष्यातील प्रत्येक क्षण रुग्णसेवेत घालविला. तमाम गोमंतकीय जनतेला त्यांच्या वैद्यकीय सेवेचा लाभ झाला. आज ते हयात नसले तरी वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे कार्य गोव्याच्या इतिहासात कायम राहील, असे मिनानाथ उपाध्ये म्हणाले. बोरी पंचायतीच्या नवीन सभागृहाला डॉ. देसाई यांचे नाव देण्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला होता. त्याला पंचायत मंडळाने मंजुरी दिली आहे. सभागृहाचे काम पूर्ण झाल्यानंतर हे नामकरण होईल, असे सरपंच ज्योती नाईक यांनी जाहीर केले. विनय पारपती म्हणाले, डॉ. मंजुनाथ देसाई आज हयात नसले तरी त्यांचे कार्य बोरी गावातील प्रत्येक नागरिकाच्या स्मरणात कायम राहील. संजय भट बोरकर यांचेही यावेळी भाषण झाले.