सिंगापूरमध्ये दाखल ः तैवानचा उल्लेख नाही
वृत्तसंस्था/ सिंगापूर
अमेरिकेच्या संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी आशियातील 4 देशांचा दौरा करणार आहेत. सर्वप्रथम पेलोसी सिंगापूरमध्ये पोहोचल्या आहेत. त्यानंतर मलेशिया, दक्षिण कोरिया आणि जपानचा दौरा करतील. त्यांच्या या दौऱयामुळे चीन अत्यंत नाराज होता. पेलोसी या तैवानचा दौरा करणार असल्याचे चीनने नाराजी व्यक्त केली होती. परंतु त्यांच्या दौऱयाच्या कार्यक्रमात तैवान सामील नसल्याचे एका अधिकृत वक्तव्यात म्हटले गेले आहे.
पेलोसी यांच्या प्रस्तावित तैवान दौऱयावरून अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांचे प्रशासन आणि तेथील सैन्यावर दडपण आले होते. चीन नॅन्सी यांच्या विमानावर हल्ला करू शकतो अशी भीती त्यांना सतावत होती. चीनने तैवाननजीक युद्धाभ्यास केल्याने हल्ल्याचा धोका वाढला होता.
परंतु पेलोसी यांनी अद्याप तैवान दौऱयाबद्दल कुठलीच पुष्टी दिलेली नाही. पेलोसी या तैवानला भेट देऊ शकतात असा संशय चीनला आहे. पेलोसी स्वतःच्या दौऱयाच्या कार्यक्रमात बदल करून तैवानला जाणार असल्याचेही मानले जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यांचा तैवान दौरा गुप्त ठेवण्यात येत असल्याची चर्चा आहे. नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिल्यास 25 वर्षांमध्ये पहिल्यांदाच अमेरिकेच्या उच्च पदाधिकाऱयाचा अधिकृत दौरा ठरणार आहे.
जिनपिंग यांची धमकी
तैवानमध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे नाराज चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी बिडेन यांना धमकी दिली होती. आगीशी खेळणारे लोक स्वतः जळतात एवढेच तुम्हाला सांगू इच्छितो असे जिनपिंग यांनी बिडेन यांना उद्देशून म्हटले हेते. अमेरिकेने तैवानला कुठल्याही प्रकारची मदत करणे चीनला कदापिही मान्य होणार नाही.
तैवानवरून आमने-सामने
चीन ‘वन-चायना’ पॉलिसी अंतर्गत तैवानला स्वतःचा हिस्सा मानतो. तर तैवान स्वतःला एक स्वतंत्र देश मानतो. तैवानवर नियंत्रण मिळविण्याचा चीनचा प्रयत्न आहे. याकरता चीनने तैवानवरील दबाव विविध प्रकारे वाढविला आहे. तर अमेरिकेने तैवानला संरक्षणसामग्री पुरविण्याचे धोरण अवलंबिले आहे.