चीन संतप्त, दिली अमेरिकेला धमकी, अमेरिकेने संरक्षण सज्जता वाढविली
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकच्या कनिष्ठ लोकप्रतिनिधीगृहाच्या (अमेरिकन काँगेस) नेत्या नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱयाला प्रारंभ झाला असून त्या भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री आठ वाजता सिंगापूरहून तैवानला पोहचल्या आहेत. यांचे तैवानमध्ये मोठे स्वागत करण्यात आले. त्यांच्या या दौऱयामुळे चीनचा तिळपापड झाला असून त्याने पुन्हा अमेरिकेला धमकी दिली आहे.
तैवान या समृद्ध देशाला चीन आपलाच भाग समजतो. त्यामुळे या देशाच्या स्वतंत्र अस्तित्वाला चीनने नेहमीच विरोध केला आहे. मात्र, अमेरिकेने तैवानच्या संरक्षणाची हमी घेतली आहे. चीनने तैवानवर आपला सामरिक दबाव वाढविण्यास प्रारंभ केला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये तैवानच्या सागरतटाच्या आसपास आणि तैवानच्या वायुक्षेत्रात चीनच्या नौका आणि विमानांनी घुसखोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे तैवानची सुरक्षा धोक्यात आली आहे.
अमेरिकेचा इशारा
चीनने तैवानवर हल्ला केल्यास अमेरिका चीनशी युद्ध करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या कनिष्ठ प्रतिनिधीगृहाच्या नेत्या आणि डेमॉपेटिक पक्षाच्या प्रतिधिनी नॅन्सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा त्या देशाची असलेला अमेरिकेचा बंधूभाव सिद्ध करण्यासाठी आयोजित केला आहे.
चीनचा संताप
पेलोसी यांनी तैवानचा दौरा केल्यास चीन आणि अमेरिकेचे संबंध बिघडतील. तैवानच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होईल. जगात अस्थिरात निर्माण होईल. अमेरिकेने आगीशी खेळ करण्याचा प्रयत्न केल्यास ती जळून जाईल, अशा प्रक्षोभक भाषेत चीनने अमेरिकेला दरडावले आहे. तरीही पेलोसी यांनी त्यांचा दौरा सुरु केल्याने जगाचे पुढील घडामोडींकडे लक्ष लागले आहे.