Tarun Bharat

Special story; नॅनो युरिया ठरणार शेतकऱ्यांना वरदान ! जाणून घ्या फायदे !

Advertisements

अभिजीत खांडेकर : तरूण भारत

गुजरात मधील कलोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पहील्या आणि सर्वात मोठ्या नॅनो युरिया प्लँटचे उद्घाटन केले. भारत सरकारच्या मालकीची असलेली इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह (IFFCO) लिमिटेड या कंपनीचा हा प्लांट असून भारतीय खतउत्पादन क्षेत्राच्या इतिहासात हा एक मैलाचा दगड ठरणार आहे. भारतासह जगभरातील कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची क्षमता असलेल्या उत्पादनात, भारतीय शेतकरी खत सहकारी संस्था (इफ्को) ने ‘नॅनो युरिया लिक्विड’ चे व्यावसायिक उत्पादन सुरू केले आहे.


य़ुरीया हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. पांढरा शुभ्र, चकचकीत आणि दाणेदार असलेला युरीया उत्पादन वाढीसाठी महत्वाची भुमिका पार पाडतो. शिवारात उभ्या असणाऱ्या उसापासून ते जमिनीलगत असणाऱ्या भाजीपाल्यासाठी, तरारून आलेल्या भातापासून ते भुऊमुगाच्या पिकासाठी सगळीकडेच युरिया महत्वाचा आहे. पाऊस कधी पडणार ? शेतीमालाला दर मिळेल की नाही? या प्रश्नाबरोबरच युरिया उपलब्ध होईल का ? आणि झालाच तर तो कमी दरात मिळेल काय ? याचबरोबर उपलब्ध खताची वाहतूक, साठवण, खतांचा डोस देण्यासाठी मजूरांची उपलब्धता हेसुद्धा शेतकऱ्यांना नेहमी पडणारे प्रश्न.


पण आता युरियाच्या बाबतीतले शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न सुटणार आहेत आणि त्याला कारणीभूत आहे रमेश रालिया हा माणूस. एक केमिकल रिसर्चर असलेल्या डॉ. रालिया यांनी दाणेदार युरियाला लिक्विड फॉर्ममध्ये आणून अर्ध्या लिटरच्या बाटलीत युरियाची ५० किलोची बॅग बसवली आहे. म्हणजेच अर्धा लिटर लिक्वीड फॉर्ममध्ये असलेल्या नॅनो युरियाची क्षमता ही ५० किलोच्या दाणेदार युरियाच्या बॅगेच्या बरोबरीची असणार आहे.


पारंपारिक युरिया हे एक दाणेदार रासायनिक नायट्रोजन खत असून तो पांढरा शुभ्र रंगाचा असतो. युरिया हा पिकांना कृत्रिमरित्या नायट्रोजन प्रदान करतो जो वनस्पतींना आवश्यक असलेला एक प्रमुख पोषक घटक आहे. दाणेदार स्वरूपात असलेल्या पारंपारिक युरियाची एक बॅग ५० किलोच्या पॅकिंगमध्ये आहे. अशी बॅग वाहतूक आणि साठवणीच्या दृष्टीने ती खुपच गैरसोयीची ठरते. युरियाच्या एका बॅगची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 3,500 ते 4,000 रुपये असून देशात तो लक्षणीय प्रमाणात आयात केली जातो. एव्हढा महाग युरिया भारतीय शेतकऱ्यांना परवडत नसल्याने भारत सरकार शेतकऱ्यांना हजारो कोटींची सबसिडी देते. ही सबसिडी चालु वर्षी 2 लाख कोटी असेल, जे मागील वर्षी भरलेल्या 1.6 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 25 टक्क्यांनी जास्त आहे.


नॅनो युरिया हे मूलत: नॅनोपार्टिकलच्या स्वरूपातील युरिया आहे. दाणेदार स्वरूपातील युरियातील नायट्रोजनचे कॉन्संट्रेशन करून त्याचे लिक्विड फॉर्म तयार केले आहे. याच्या अर्धा लिटरच्या बाटलीमध्ये ४० हजार पीपीएम नायट्रोजन असून ते ५० किलोच्या बॅगेच्या क्षमतेइतके असते.
नॅनो युरियाचे शेतकऱ्यांसाठी फायदे काय आहेत ?


सगळ्यात महत्वची उपलब्धता. यापुर्वी बऱ्याच अंशी युरियासाठी परकिय देशांवर अवलंबून रहावे लागत असे. पण या बाबतीत भारत आता स्वावलंबी झाला असून नॅनो युरियाच्या माध्यमातून तो शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणार आहे.


शेतकरी हंगामात एका क्षेत्रात प्रत्येकी ५० किलोची 2 पोती वापरतो, त्या ठिकाणी नॅनो युरियाची एकच बाटली काम करू शकते. याच्या अर्ध्या लिटरच्या बाटलीमध्ये ४० हजार पीपीएम नायट्रोजन असतात, जी दाणेदार युरियाच्या एका बॅगेच्या क्षमतेईतकी असते. नॅनो युरिया हा दाणेदार युरियापेक्षा जास्त परिणाम कारक असून याच्या वापराने उत्पादनात आश्चर्यकारक वाढ झाल्याचे दिसून येते. साधारणता दाणेदार युरिया त्याच्या क्षमतेच्या ३५ ते ४० टक्क्यापर्यंत पिकांना पोषक ठरतो, तर नॅनो युरिया ८० टक्क्यापर्यंत पिकांचे पोषण करतो.


नॅनो युरिया पानांद्वारे शोषला जाऊन तो प्रमाणात जास्तीत जास्त प्रमाणात वापरात येतो. हा लिक्वीड फॉर्ममध्ये असल्याने चांगल्या प्रकारे शोषला जाऊन त्याचे कोणतेच अवशेष शिल्लक राहत नाहीत त्यामुळे नॅनो युरिया पर्यावरण पुरक आहे. तर पारंपारिक युरिया फक्त ३५ ते ४० टक्के पिकांकडून शोषला जाऊन वापरात येतो तर बाकीचा युरिया हा मातीमध्ये, पाण्यामध्ये, पडून वाया जातो. पण हा वाया गेलेला युरिया पर्यावरणाला खुपच घातक आहे. या युरियातून नायट्रस ऑक्साईड तयार होतो. नायट्रस ऑक्साईडमुळे मुख्यत: पाण्याचे जलस्त्रोत, सुपिक माती आणि इतर पर्यावरणीय घटक प्रदुषित करतो.
नायट्रस ऑक्साईडमुळे जलवायु उत्सर्जन होते. त्यामुळे जागतिक तापमान वाढीचे एक महत्वाचे कारण म्हणून नायट्रस ऑक्साईड आणि पर्यायाने पारंपारिक युरियाकडे पाहिले जाते.


पारंपारिक युरिया हा खुपच महाग आहे. आंतरराष्ट्रिय बाजारामध्ये एका बॅगेसाठी ३ ते ४ हजार रूपये मोजावे लागतात. असा युरिया भारतीय शेतकऱ्यांना परवडत नाही. म्हणून केंद्र सरकार याच्या अनुदानापोटी शेतकऱ्यांना हजारो कोटींची सबसिडी देते. देशात भारत सरकार युरिया ३०० ते ४०० रूपयांना उपलब्ध करून देत असते. पण नॅनो युरिया पारंपारिक युरियापेक्षा १० टक्कांनी स्वस्त असुन यामुळे शासनाचे हजारो कोटी रूपये वाचणार आहेत.


पारंपारिक युरियाची बॅग ही ४० किलोची असल्याने ती हताळण्यास खुपच जिकरीचे आहे. तसेच याची वाहतूक, दळणवळण करताना अवजड वाहने वापरावी लागतात, त्यामुळे याच्या किमतीमध्ये वाढ होते. पण नॅनो युरिया हा बाटलीमध्ये येत असल्याने सहज बाजरला गेल्यावर खिशातून सुद्धा आणता येते.

.

Related Stories

कुस्ती क्षेत्राला आलेली मरगळ दूर होईल : हिंदकेसरी पै. संतोषआबा वेताळ

datta jadhav

कोल्हापूर : बिगरशेतीची बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या एकास अटक

Abhijeet Shinde

बालविवाह झाल्यास सरपंच, सदस्य, ग्रामसेवकावर कारवाई

Kalyani Amanagi

ऊंट गाडीवर पहिली मोबाइल लायब्रेरी

Amit Kulkarni

कोल्हापूर व मुंबई विभागातील उच्च माध्यमिक शाळांना न्याय देऊ – नाना पटोले

Abhijeet Shinde

सातारा : आरोग्य विभागावर वाढती जबाबदारी, नागरिकांचा सहभाग मोलाचा : डॉ. आठल्ये

Abhijeet Shinde
error: Content is protected !!