वृत्तसंस्था/ पॅरिस
प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत जपानच्या नाओमी ओसाकाला पुनरागमनात पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. मागील वर्षी तिने वादग्रस्तरीत्या या स्पर्धेतून माघार घेतली होती. पोलंडची इगा स्वायटेक, मारिया सॅकेरी, लैला फर्नांडेझ, बेलिंडा बेन्सिक, स्पेनचा कार्लोस अल्कारेझ, जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह, फेलिक्स ऍलियासिमे यांनी विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली.
जपानच्या ओसाकाला अमेरिकेच्या अमांदा ऍनिसिमोव्हाने 7-5, 6-4 असे हरवित दुसरी फेरी गाठली. 2019 मध्ये उपांत्य फेरी गाठणाऱया ऍनिसिमोव्हाने तिसऱया मॅचपॉईंटवर सामना संपवला. ओसाकाकडून या सामन्यात आठवेळा डबलफॉल्ट झाले व 29 चुका केल्या. मागील वर्षी माघार घेतल्यानंतर होणाऱया सक्तीच्या पत्रकार परिषदेला ती उपस्थित राहिली नाही. नंतर तिने आपण डिप्रेशनमधून जात असल्याचे सांगितले होते. आयोजकांनी तिच्यावर दंडात्मक कारवाई केली आणि ग्रँडस्लॅम बंदीचा इशाराही दिला होता. यावर्षी विम्बल्डनमध्ये मानांकन गुण मिळणार नसल्याने या स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचेही ओसाकाने म्हटले आहे.
स्वायटेक दुसऱया फेरीत
महिला एकेरीची संभाव्य विजेत्या मानल्या जाणाऱया स्वायटेकने युक्रेनच्या पात्रता फेरीतून आलेल्या लेसिया सुरेन्कोचा 6-2, 6-0 असा धुव्वा उडविला. तिने आता सलग 29 सामने जिंकले आहेत. गेल्या पाच स्पर्धांत जागतिक अग्रमानांकित स्वायटेकने पाच स्पर्धा जिंकल्या असून दुसऱया पेंच स्पर्धा जिंकण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. याआधी 2020 मध्ये तिने ही स्पर्धा जिंकली होती. तिची पुढील लढत यास्त्रsम्स्का किंवा ऍलिसन रिस्के यापैकी एकीशी होईल. चौथ्या मानांकित ग्रीसच्या मारिया सॅकेरीने क्लारा ब्युरेलचा 6-2, 6-3 असा पराभव केला. या मोसमातील तिचा हा 20 वा विजय असून झेकच्या कॅरोलिना मुचोव्हाशी तिची दुसरी लढत होईल. स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेन्सिकनेही दुसरी फेरी गाठताना हंगेरीच्या रेका लुकाचा 6-1, 6-1 असा फडशा पाडला. लैला फर्नांडेझने फ्रान्सच्या क्रिस्टिना म्लाडेनोविकवर 6-0, 7-5 असा विजय मिळविला. तिची लढत कॅटरिना सिनियाकोव्हाशी होणार आहे.
अल्कारेझचा विजयी प्रारंभ
पुरुष एकेरीत स्पेनचा युवा सेन्सेशन कार्लोस अलकारेझने जुआन इग्नेशियो लाँडेरोचा 6-4, 6-2, 6-0 असा पराभव करीत प्रेंच मोहिमेला सुरुवात केली. त्याने या मोसमात चार स्पर्धा जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून माद्रिदमधील एकाच स्पध्sा&त त्याने नदाल व जोकोविच या दोघांचाही पराभव करण्याचा पराक्रम केला आहे.
जर्मनीच्या तिसऱया मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्हने सफाईदार प्रदर्शन करीत दुसरी फेरी गाठताना ऑस्ट्रियाच्या सेबॅस्टियन ऑफनरचा 6-2, 6-4, 6-4 असा पराभव केला. पदार्पणवीर टॅलन ग्रीकस्पूरनेही दुसरी फेरी गाठली असून त्याने 25 व्या मानांकित अलेजांड्रो डेव्हिडोविच फोकिनावर 2-6, 6-0, 6-4, 6-3 अशी मात केली. कॅनडाच्या जागतिक 9 वा मानांकित फेलिक्स ऑगर ऍलियासिमेने पेरूच्या जुआन पाब्लो व्हेरिलासवर संघर्षपूर्ण लढतीत 2-6, 2-6, 6-1, 6-3, 6-3 अशी मात करीत दुसरी फेरी गाठली. तिसऱयांदा तो या स्पर्धेत खेळत असून अस्लन कारात्सेव किंवा कॅमिलो युगो कॅराबेली यापैकी एकाशी त्याची पुढील लढत होईल.