Tarun Bharat

नरदेह महात्म्य

Advertisements

अध्याय विसावा

भगवंत उद्धवाला सांगत आहेत की, उद्धवा! आपापल्या वर्णाश्रमधर्मानुसार फळाची आशा न करता यज्ञादी सत्कर्मे केली आणि निषिद्ध कर्मे केली नाहीत, तर त्याला स्वर्गनरकात जावे लागत नाही. गृहस्थाश्रमामध्ये स्वधर्मानुरूप राहिले, तर येथेच नक्की विरक्ती प्राप्त होते.

परद्रव्य आणि परदारा ह्यांचा अभिलाष व परनिंदेचा हव्यास, यालाच उध्दवा! ‘नरकाचा मार्ग’ म्हणतात. स्वर्गातील सुख ऐकून तेच पाहिजे म्हणून ज्याचे मन हट्ट करते आणि जो तदनुकूल कर्मे करतो, त्याला अचूक स्वर्गभोग प्राप्त होतो. नरकगती किंवा स्वर्गप्राप्ती ह्या दोन्ही ‘अन्यगती’ म्हणजे विपरीत स्थिती आहेत.  हे वेळीच ओळखून यातून वृत्ती काढून यज्ञादिक कर्मानी माझे यजन केले असता, नित्यनैमित्तिक कर्मानीच वैराग्यस्थिती म्हणजे नैराश्य प्राप्त होते. त्यामुळे स्वर्गामध्ये वस्ती करावी लागत नाही किंवा नरकातही जावे लागत नाही. इहलोकीच विरक्तता प्राप्त होते. आपल्या धर्माच्या ठिकाणी नि÷ा ठेवणारा या देहात राहूनच निषिद्ध कर्मे न करण्याने पवित्र होतो, त्याला विशुद्ध ज्ञान प्राप्त होते किंवा त्याचे भाग्य असल्यास त्याला माझी भक्ती प्राप्त होते. ह्या लोकात वागत असताना अशा प्रकारे स्वधर्माचरण करीत राहिले म्हणजे पुण्य आणि पाप ह्या दोहोंचेही क्षालन होऊन तो निर्मलत्वाने अत्यंत पवित्र होतो. संसाराचे भान नाहीसे होऊन त्याला माझे ‘शुद्ध ज्ञान’ प्राप्त होते किंवा माझे सप्रेम भजन म्हणजे ‘पराभक्ति’ त्याला प्राप्त होते. अशा भक्तीमध्ये मी स्वतः निरंतर भक्ताच्या अधीन होऊन राहतो. तेव्हा ज्ञान मोक्षासहवर्तमान आपणहूनच येऊन भक्ताच्या पायाला लागते. आता त्या ज्ञानाचा परिणाम ऐक. ज्ञान संसाराला ‘महादुःख’ व मोक्षाला ‘परमसुख’ असे नाव देते परंतु माझा भक्त सुख आणि दुःख दोन्हीही मानत नाही. प्रेमाने माझे भजन करत असता संसारभयाचे बंधन मुळीच वाटत नाही तर मोक्षाला कोण विचारतो? माझ्या भक्तांना भक्तीचाच पूर्ण उल्हास असतो. त्यामुळे ज्ञान ज्याला ‘महादुःख’ असे म्हणते ते भक्तांना भगवद्रूपच असते तसेच ज्याला ‘महासुख’ असे म्हणतात, तेही त्यांना भगवद्रूपच असते. अशा प्रकारे माझा भक्त माझ्या भजनामध्ये सुख, दुःख दोन्ही विसरतो. माझ्याशिवाय त्रिभुवनात दुसरे काही त्याला दिसतच नाही पण अशा प्रकारची माझी पूर्ण भक्ती करीन म्हणून करता येत नाही हे लक्षात ठेव. जेव्हा मी भगवंत प्रसन्न होतो, तेव्हाच दैवयोगाने ती प्राप्त होते. आता मी कशाने प्रसन्न होतो असे तुझ्या मनात येईल, तर त्याचे उत्तर सांगतो की, मला प्रसन्न करून घ्यावयाला हा नरदेह हे एकच कारण आहे. स्वर्गातील देव आणि नरकातील लोकसुद्धा या मनुष्यदेहाची इच्छा करतात कारण हे शरीरंच ज्ञान किंवा भक्ती यांचे साधन आहे. स्वर्गीय किंवा नारकीय शरीरे फक्त भोगसाधने आहेत. ज्यांना स्वर्गभोगाची अतिशय गोडी आहे, ज्यांनी अमरत्वाची गुढी उभारली आहे, असे जे स्वर्गाच्या बंदीखान्यात पडले आहेत, ते सुद्धा मोठय़ा आवडीने नरदेहाचीच इच्छा करतात. तसेच ज्यांनी भयंकर नरकयातना भोगलेल्या असतात, ते प्राणीही मोठय़ा आवडीने नरदेहाची इच्छा करतात. नरदेह हा अत्यंत पवित्र असून भक्तीचे आणि ज्ञानाचे तो आश्रयस्थान आहे. ज्याच्या योगाने ब्रह्मज्ञान प्राप्त होते, तो नरदेह केवळ धन्य होय. ह्या नरदेहामुळेच जन्ममरण निखालस खुंटून जाते, जीव समाधान पावतो आणि स्वतः स्वानंदघन होतो. ज्या नरदेहाच्या संगतीने अविद्येची निवृत्ती होते व भगवत्पदाची प्राप्ती होते, त्या नरदेहाची ही कीर्ति प्रसिद्धच आहे. सर्व प्राणिमात्र नरदेहाचीच इच्छा करतात. प्राण्यांचं काय घेऊन बसलास, प्रत्यक्ष ब्रह्मदेवही नरदेहाची इच्छा करतो, इतका नरदेह श्रे÷ आहे. कारण यात भक्ती आणि ज्ञान हे दोन्हीही प्राप्त होतात. विचारवंताने स्वर्ग, नरक किंवा देह यापैकी कशाचीही कामना करू नये कारण देहात अहंबुद्धी बाळगल्यामुळेच त्याच्याकडून प्रमाद घडतात. नरदेहाची प्राप्ती झाली तरी, अधर्माने वागल्यास नरकासच जावे लागते किंवा पुण्यसंपत्तीचा संग्रह केल्यास अचूक स्वर्गाची प्राप्ती होते.

            क्रमशः

Related Stories

कोरोना आणि राजकारण्यांचा पाठशिवणीचा खेळ सुरूच

Amit Kulkarni

भाजप नेत्यांच्या तारखा!

Omkar B

आता हवे ‘सम्यक’ भान आणि ‘तारतम्य’

Patil_p

काय सांगशील?

Patil_p

कोकणातील रुग्णसंख्या चिंताजनक

Patil_p

मताला लसीची फोडणी

Patil_p
error: Content is protected !!