Tarun Bharat

खानापूर नगराध्यक्षपदी नारायण मयेकर बिनविरोध

प्रतिनिधी /खानापूर

खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी नारायण मयेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगरपंचायतीच्या सभागृहात झालेल्या मतदान प्रक्रियेत तहसीलदार प्रवीण जैन यांनी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. सकाळी 10 ते 2 या वेळेत निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली.

नगराध्यक्ष मजहर खानापुरी यांनी राजीनामा दिल्याने नगराध्यक्षपद रिक्त झाले होते. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते. यानुसार शुक्रवार दि. 2 रोजी नगरपंचायत सभागृहात निवडणूक अधिकारी म्हणून प्रवीण जैन यांनी सकाळी 10 वाजल्यापासून प्रक्रिया राबविण्यास सुरू केली. 10 ते 2 या वेळेत इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन केले. नगरपंचायतीच्या 19 नगरसेवकांनी मयेकर यांना पाठिंबा जाहीर केल्याने नारायण मयेकर यांचा एकमेव अर्ज राहिला. दुपारी 2 नंतर प्रवीण जैन यांनी नारायण मयेकर यांची नगराध्यक्ष म्हणून घोषणा केली. यानंतर झालेल्या बैठकीत सर्व नगरसेवकांनी नारायण मयेकर यांचे अभिनंदन केले. यावेळी नगरपंचायतीच्यावतीने मुख्याधिकारी वठारे व इतर कर्मचाऱ्यांनीही अभिनंदन केले.

यावेळी भाजप नेते विठ्ठल हलगेकर यांनी नारायण मयेकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर नगरसेवक लक्ष्मण मादार, अप्पय्या कोडोळी, नारायण ओगले, माजी नगराध्यक्ष मजहर खानापुरी, स्थायी समिती चेअरमन प्रकाश बैलूरकर, नगरसेविका मेघा कुंदरगी यांची शुभेच्छा देणारी भाषणे झाली.

शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार

 नारायण मयेकर म्हणाले, माझ्यावर नगराध्यक्षपदाची जबाबदारी विश्वासाने दिली आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ न देता सर्वसमावेशक विकासावर भर देण्यात येईल. संपूर्ण शहराच्या विकासास प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले व सर्वांचे आभार मानले. यानंतर त्यांनी शहरातील शिवस्मारक येथील शिवाजी महाराज तसेच बसवेश्वर चौकातील संत बसवेश्वर व बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. नारायण मयेकर यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

Related Stories

बेळगाव जिह्यात मंगळवारी ४०४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Tousif Mujawar

‘बिम्स’ला 50 लाख अतिरिक्त अनुदान द्या

Amit Kulkarni

श्री सिद्धेश्वर गो-शाळेचा शुभारंभ

Omkar B

लघुउद्योग भारतीचा स्थापना दिन साजरा

Amit Kulkarni

राजश्री तुडयेकर यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

Patil_p

भाषिक तणावाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर-निपाणी बससेवा बंद

Archana Banage