Tarun Bharat

नरदेह म्हणजे घबाड आहे

अध्याय सविसावा

भगवंत उद्धवाला नरदेहाचे महात्म्य पटवून देताना म्हणाले, उद्धवा, नरदेह म्हणजे घबाड आहे कारण नरदेहामध्येच ब्रह्म पूर्णपणे जाणण्याचे सामर्थ्य आहे. माझ्या प्राप्तीचे मुख्य साधन असलेले हे शरीर मिळाल्यावर जो माझी भक्ती करतो, तो मला आनंदस्वरूप परमात्म्याला प्राप्त होतो. मी भावाचा, भक्ताच्या प्रेमाचा भुकेला असल्याने भक्ताने भक्तीच्या माध्यमातून माझ्यावर केलेल्या प्रेमाने मलाही त्याच्याबद्दल अत्यंत प्रेम वाटते आणि मी त्याला माझ्यात सामावून घेतो. देवादिकसुद्धा नरदेह प्राप्त व्हावा म्हणून धडपडत असतात कारण देवयोनी ही भोगयोनी असल्याने त्यातून ब्रह्म जाणण्याचे ज्ञान मिळू शकत नाही. म्हणून हे मानवी शरीर तिन्ही लोकात पवित्र आहे.

मनुष्य जन्माला आल्यावर निरपेक्षपणे मी दिलेले काम त्याने केले की, त्याचा उद्धार होतो. मनुष्यदेहाला येऊन अधर्म केला असता परब्रह्म हाती लागत नाही. ह्याकरिता परम पावन अशा भागवतधर्माचे आचरण करावे. भागवतधर्माला अनुसरून भक्ती केली असता चित्तवृत्ती निर्मळ होते आणि जीव तोच ब्रह्म आहे हे परमज्ञान मनात ठसते. ब्रह्मस्फूर्ती मनात ठसली की, त्या योगाने साधक परमानंदांत लीन होतो. असे परमानंदात लीन व्हायची संधी मिळणे हीच माझी खरी प्राप्ती होय. एखाद्याला माझी प्राप्ती झाल्याचे कसे कळते हे विचारशील तर तो प्रत्यक्ष देहात असूनही त्याला विषयाची मुळीच आठवण नसते.

सामान्य मनुष्यासाठी हे केवळ अशक्मय आहे कारण माणसाचा जन्मच मुळी विषयातून झालेला असतो. त्यामुळे विषय हे त्याच्या हाडीमासी खिळलेले असतात. त्याला जेव्हा माझी प्राप्ती होते तेव्हा तो माझ्यात इतका विरघळून गेलेला असतो की, त्याला विषयांचा पूर्ण विसर पडतो. त्यामुळे संपूर्ण निर्वासन झाल्याने तो त्रिगुणातीत होतो आणि त्याची चालू असलेला जन्म संपला की, जन्म मृत्युच्या चक्रातून सुटका होते. या सगळय़ाचा परिणाम असा होतो की, मायास्वरूप गुणांच्या पसाऱयात राहूनही तो त्यामुळे बांधला जात नाही. त्याच्यापुरते गुणांना काहीच कार्य उरलेले नसल्याने त्या गुणांना अस्तित्वच रहात नाही. हे सगळे ऐकून उद्धवाने भगवंतांना विनंती केली की, भगवंता मला त्रिगुणात्मक मायेबद्दल सविस्तर सांगा. भगवंताना लाडक्मया उद्धवाची विनंती फार आवडली आणि ते मायेबद्दल विस्तारपूर्वक सांगू लागले. ते म्हणाले, माया ही मुळची अज्ञानाची खाण असून, तीन गुणांची माता आहे. हिचे अस्तित्व अनादि कालापासून आहे. ह्या मायागुणांच्या योगाने, पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पाच विषय आणि मन मिळून सोळा कळांचा वासनात्मक लिंगदेह उत्पन्न होतो.

हा लिंगदेहच जिवाला खिळून बसतो आणि जीवाला अक्षरशः नाचवतो. या लिंगदेहामुळेच जीव नानाप्रकारचे  सुखदुःख भोगतो, स्वर्गनरकाच्या भोवऱयात सापडतो आणि मिथ्या असलेल्या जन्ममरणाच्या राशी स्वतः सोसतो. वांझ स्त्रीला कधी मुलगा होईल हे जसे अशक्मय आहे त्याप्रमाणे हा संसार जीवाच्या दृष्टीने निरर्थक आहे. असे असले तरी देहाभिमानाने त्या संसाराचा पसारा अपरंपार व अनिवार असा वाढविला आहे. स्वतःच्या बलाने यातून सुटका करून घेऊ असे माणसाने ठरवले तर ते सर्वस्वी अशक्मय आहे कारण त्याच्यावर असलेला त्रिगुणात्मक मायेचा पडदा त्याला तसे करू देत नाही परंतु त्या जीवाला गुरूपदेशाने ज्ञानाचा अनुभव आला असता त्याच्यावरील मायेचा प्रभाव नाहीसा होतो. त्याला लिंगदेह खोटा वाटू लागतो व जीवाचा जीवपणाही मिथ्या होतो. ज्याप्रमाणे सूर्योदय झाला म्हणजे अंधारासह रात्र नाहीशी होते, त्याप्रमाणे गुरूपदेशाने ज्ञानप्राप्ती झाली की मायेचे स्वरूप मावळते. अशा प्रकारे गुणांचे विकार नाहीसे झालेले सद्गुरूंचे शिष्य जीवन्मुक्त होतात. जीवन्मुक्त झालेले भक्त व्यवहार कसा करत असतात असे विचारशील तर, ज्याप्रमाणे घडा तयार झाल्यावरही कुंभाराचे चाक पूर्वी प्राप्त झालेल्या गतीने फिरत रहाते त्याप्रमाणे पूर्वप्रारब्धाच्या उरलेल्या वृत्तीने ज्ञातेही आपल्या देहामध्ये वागत असतात. विशेष म्हणजे ते देहस्थितीने वागत असताही त्यांना देहाचा अभिमान असत नाही.

क्रमशः

Related Stories

शिक्षण महर्षि – सिंबायोसिसचे शां. ब. मुजुमदार

Patil_p

अवधूत उवाच

Patil_p

ऐतिहासिक शिक्कामोर्तब

Patil_p

जागतिक आर्थिक विषमता वाढण्याची शक्यता

Patil_p

अक्षत विवरिं तव भर्ता

Patil_p

दहा वर्षे तरी पेट्रोल, डिझेल महत्त्वाचेच !

Patil_p
error: Content is protected !!