पहिल्यांदाच महिला अन् कृष्णवर्णीय अंतराळवीराची निवड
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
नासा 50 वर्षांनी चंद्रावर अंतराळवीर पाठविणार आहे. आर्टेमिस-2 मोहिमेच्या अंतर्गत पुढील वर्षी 4 अंतराळवीर चंद्राला प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर परतणार आहेत. या पथकात पहिल्यांदाच एक महिला अन् एका कृष्णवर्णीय अंतराळवीराला सामील करण्यात आले आहे. अपोलो मिशनला 50 वर्षांपेक्षा अधिक काळ उलटून गेल्यावर एखादा मनुष्य चंद्रापर्यंत पोहोचणार आहे.
10 दिवसांच्या या चांद्रमोहिमेसाठी क्रिस्टिना हॅमॉक कोच यांची तज्ञ म्हणून निवड करण्यात आली आहे. यापूर्वी क्रिस्टिना यांनी सर्वाधिक काळापर्यंत अंतराळात वास्तव्य करण्याचा विक्रम नोंदविला आहे. त्यांच्याबरोबर अमेरिकेच्या नौदलाचे अधिकारी व्हिक्टर ग्लोवर यांची पायलट म्हणून निवड झाली आहे. चांद्रमोहिमेच्या अंतर्गत अंतराळात जाणारे ते पहिले कृष्णवर्णीय अंतराळवीर असणार आहेत.
2025 मध्ये चंद्रावर उतरणार अंतराळवीर
मोहिमेसाठी निवडण्यात आलेल्या 4 पैकी 3 अंतराळवीर अमेरिकेचे तर एक अंतराळवीर कॅनडाचा आहे. या अंतराळवीरांच्या नावांची घोषणा ह्युस्टन येथील जॉन्सन स्पेस सेंटरमधून करण्यात आली आहे. चांद्रमोहिमेच्या दरम्यान अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवणार नाहीत. ही एक फ्लायबाय मिशन असून याच्या अंतर्गत अंतराळवीर केवळ चंद्राला प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर परतणार आहेत. ही मोहीम यशस्वी ठरल्यास 2025 मध्ये आर्टेमिस-3 मिशन राबविण्यात येणार आहे. आर्टेमिस-3 मोहिमेत अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवणार आहेत.
22 लाख किमी प्रवासाचे लक्ष्य
आर्टेमिस-2 मोहिमेदरम्यान सुमारे 22 लाख किलोमीटरचा प्रवास करणार आहे. ओरियन स्पेसशिपच्या सर्व लाइफ-सपोर्ट सिस्टीम्स योग्यप्रकारे डिझाइन करण्यात आल्या आहेत की नाही पडताळून पाहणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. यातून अंतराळवीरांना डीप स्पेसमध्ये जाण्यास आणि 2025 मध्ये चंद्रावर लँडिंगदरम्यान त्रास होऊ नये याची खबरदारी घेतील जाणार आहे. आर्टेमिस-2 मोहीम पृथ्वीवर परतण्यापूर्वी चंद्राच्या दुसऱया टोकानजीक जाणार आहे.