वृत्तसंस्था/ इंदोर
ऑस्ट्रेलियन संघातील फिरकी गोलंदाज नाथन लियॉनने येथे झालेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटीत आपल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला मोठा विजय मिळवून दिला. चार सामन्यांच्या या मालिकेत आता भारतीय संघ 2-1 अशा आघाडीवर आहे. या मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 9 मार्चपासून खेळवला जाईला. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील बॉर्डर-गावसकर चषक कसोटी स्पर्धेमध्ये नाथन लियॉनने भारताचा माजी कर्णधार आणि फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेचा विक्रम मागे टाकला. या स्पर्धेत लियॉन आता सर्वाधिक बळी घेणारा फिरकी गोलंदाज ठरला आहे. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत 113 बळी मिळवले असून अनिल कुंबळेने यापूर्वी 111 बळीचा विक्रम नेंदवला होता.
इंदोरच्या तिसऱ्या कसोटीत लियॉनने दुसऱ्या डावात 8 गडी बाद केले. उमेश यादव हा नाथन लियॉनचा 112 वा बळी ठरला. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या स्पर्धेत लियॉनने आपला पहिला सामना 2011 साली खेळला होता. त्यानंतर त्याने या स्पर्धेत 25 सामन्यात 1164.4 षटकांची गोलंदाजी करत 36,008 धावांच्या मोबदल्यात एकूण 113 बळी मिळवले आहेत. लियॉनने या सामन्यात 50 धावात 8 गडी बाद केले. त्याची ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेत आता नाथन लियॉनला भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन मागे टाकू शकेल. अश्विनने या स्पर्धेमध्ये 21 सामन्यात 107 बळी मिळवले असून त्याची 103 धावात 7 बळी ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. अहमदाबादमध्ये होणाऱ्या शेवटच्या कसोटीनंतर या मालिकेतील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज निश्चित होईल. भारताविरुद्ध सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आता नाथन लियॉन दुसऱ्या स्थानावर आहे. लियॉनने लंकेचा माजी फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनला मागे टाकले आहे. त्याने 105 गडी बाद केले आहेत. इंग्लंडचा 40 वर्षीय वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक म्हणजे 139 गडी बाद करत आपले आघाडीचे स्थान कायम राखले आहे. इंदोरच्या तिसऱ्या कसोटीच्या बक्षीस वितरण समारंभावेळी नाथन लियॉन हा माझ्या वैयक्तिक दृष्टीकोनातून सध्या सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे मत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले आहे.