वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कॅप्टन अभिलाषा बराक यांना कॉम्बॅट एव्हिएटर म्हणून सैन्यात सामील करण्यात आले आहे. ही कामगिरी प्राप्त करणाऱया त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. अभिलाषा यांना डायरेक्टर जनरल आणि कर्नल कमांडेंट आर्मी एव्हिएशनकडून 36 सैन्य वैमानिकांसह प्रतिष्ठित विंग्सद्वारे सन्मानित करण्यात आले. युवा एव्हिएटर्स आता कॉम्बॅट एव्हिएशन स्क्वाड्रनमध्ये स्वतःचे पंख फैलावत असल्याने सैन्याकडून ट्विट करत म्हटले गेले आहे.
मागील वर्षी जूनमध्ये पहिल्यांदा 2 महिला अधिकाऱयांची निवड हेलिकॉप्टर पायलट प्रशिक्षणासाठी करण्यात आली होती. या दोन्ही अधिकाऱयांना नाशिक येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कुलमध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते. सैन्यानुसार 15 महिला अधिकाऱयांनी आर्मी एव्हिएशनमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती.
भारतीय सैन्यात पहिल्यांदाच महिला अधिकारी लढाऊ वैमानिक झाली आहे. अभिलाषा बराक यांना कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन कोर्स पूर्ण केल्यावर विंग्स (उड्डाण करण्याचे प्रमाणपत्र) प्रदान करण्यात आले. कॅप्टन अभिलाषा या मूळच्या हरियाणा येथील आहेत. महिला अधिकाऱयांना पहिल्यांदाच सैन्यात हेलिकॉप्टर पायलट होण्याची संधी मिळाली आहे.
एव्हिएशन डिपार्टमेंटमध्ये सध्या महिलांना एअर ट्रफिक कंट्रोल आणि ग्राउंड डय़ुटीची जबाबदारी दिली जाते. परंतु आता महिला अधिकारी वैमानिक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. 2018 मध्ये वायुदलाच्या फ्लाइंग ऑफिसर अवनि चतुर्वेदी या लढाऊ विमानाचे सारथ्य करणाऱया पहिल्या भारतीय महिला ठरल्या होत्या.
आर्मी एव्हिएशन कोरची स्थापना 1986 मध्ये एक ग्रूप म्हणून करण्यात आली होती. आर्मी एव्हिएशन कोरच्या उमेदवारांना नाशिकमध्ये कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षित करण्यात येते. आर्मी एव्हिएशन कोरने 1987 मध्ये श्रीलंकेत तमिळ टायगर्स विरोधात ऑपरेशन पवनमध्ये आणि 1999 मध्ये कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती.