Tarun Bharat

राष्ट्रीय कीर्तनकार उद्धवबुवा जावडेकर यांना बिल्वदल परिवाराचा ‘नारदमुनी’ पुरस्कार

खांडोळा माशेल येथील कीर्तन संमेलनात उद्या प्रदान

वार्ताहर /माशेल

बिल्वदल परिवाराचा प्रतिष्ठेचा नारदमुनी पुरस्कार यंदा राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. उद्धवबुवा जावडेकर यांना प्राप्त झाला असून बिल्वदलच्या रविवार दि. 25 रोजी खांडोळा-माशेल येथे होणाऱया सहाव्या कीर्तन संमेलनात तो राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्याहस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

बिल्वदल-परिवारातर्फे वार्षिक होत असलेल्या कीर्तन संमेलनाचे यंदा सहावे वर्ष आहे. गेल्या दोन वर्षांत कोविडमुळे संमेलन होऊ शकले नव्हते. खांडोळा येथील श्री गणपती संस्थानच्या सहकार्याने श्री गणपती मंदिराच्या सभागृहात सकाळी 9 वा.पासून कीर्तन संमेलनाला प्रारंभ होणार आहे. संमेलनाची सुरुवात सकाळी 9 वा. ह.भ.प. वंदना जोशी यांच्या सुश्राव्य कीर्तनाने होईल. त्यानंतर सकाळी 9.45 वा. प्रज्वलिता गाडगीळ आणि सहकाऱयांतर्फे मंगलाचरण कार्यक्रम होईल. सकाळी 10 वा. संमेलनाचे रितसर उद्घाटन लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि पद्मश्री विनायक खेडेकर यांच्याहस्ते समई प्रज्वलनाने होईल. यावेळी खास निमंत्रित म्हणून उद्योजक संदेश साधले हे उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी श्री गणपती देवस्थान, खांडोळाचे अध्यक्ष प्रीतम खांडेपारकर हे असतील.

त्यानंतर सकाळपासून कीर्तनाला प्रारंभ होईल. विष्णु गावस, सर्वेश साळगावकर, नूतन रेवाडकर व दत्तगुरुबुवा अभ्यंकर यांचे सुश्राव्य कीर्तन होईल. दु. 1.15 वा. महाप्रसाद होईल. भोजनोत्तर द्वितीय सत्र दु. 2.30 वा. सुरू होणार असून यामध्ये डॉ. उर्वी फडके, स्वतेजा कुंभार व मनस्वी नाईक यांचे कीर्तन होईल. त्यानंतर सायं. 4 वा. ‘आजच्या काळात कीर्तनाची आवश्यकता’ या विषयावर संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक डॉ. गोविंद काळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सोमनाथ कोमरपंत व कृष्णाजी कुलकर्णी, ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. सुहासबुवा वझे व विवेकबुवा जोशी हे सहभागी होतील.

चहापानानंतर सायंकाळी तृतीय सत्रात संमेलनाचा समारोप होईल. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वीजमंत्री सुदिन ढवळीकर हे उपस्थित राहतील व अध्यक्षस्थानी प्रीतम खांडेपारकर हे असतील. यावेळी कीर्तन क्षेत्रात गेली 50 वर्षे अखंडित सेवा बजाविणारे मूळ गोमंतकीय व सध्या पुणे येथे स्थायिक असलेले उद्धवबुवा जावडेकर यांना बिल्वदलचा ‘नारदमुनी पुरस्कार’ मंत्री ढवळीकर यांच्याहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. त्यानंतर सायं. 6 वा. समारोपाचे कीर्तन होईल. यामध्ये पुणे येथील सुप्रसिद्ध ह.भ.प. संज्योत केतकर यांचे कीर्तन होईल.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन सिद्धी उपाध्ये या करणार आहेत. कीर्तन संमेलनात तबल्यावर नारायण ऊर्फ मिलिंद बांदेकर, दत्तराज शेटय़े, हार्मोनियमवर सोहम बाक्रे आणि प्रदीप शिलकर हे साथसंगत करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून सर्वांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन बिल्वदल परिवाराने केले आहे.

ह.भ.प. उद्धवबुवा जावडेकर यांचा संक्षिप्त परिचय

मूळ सांखळी-गोवा येथील उद्धव घनःशाम जावडेकर यांना बालपणापासून संगीताची आवड. तसेच नाटय़ क्षेत्रातही त्यांनी कामगिरी बजावली होती. कीर्तनाची आवड व त्यातून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ह.भ.प. ग. ना. कोपरकर व गोविंद स्वामी आफळे यांच्याकडे कीर्तन महाविद्यालय, पुणे येथे पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र, गोवा तसेच कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, छत्तिसगड, झारखंड इत्यादी राज्यात मिळून आतापर्यंत 6500 कीर्तने केलेली आहेत. राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून त्यांना मान्यता मिळाली तसेच पुणे, मुंबई, कोल्हापूर इत्यादी अनेक संस्थांचे त्यांना पुरस्कार प्राप्त झाले. अलीकडच्या काळात ते भागवत सप्ताह देखील करतात व त्यांच्या प्रवचनाला भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळतो.

Related Stories

वकिलांनी सिने स्टाईलने केले ‘आई मुलाचे मीलन’

Patil_p

आपचे मैदानात,अन्य आमदार, लोकप्रतिनिधी गायब

Amit Kulkarni

गोव्यासाठी ‘गती शक्ती’ मास्टर प्लॅन

Amit Kulkarni

पणजी रस्त्यांची कामे पावसाळ्यातही सुरु ठेवा

Amit Kulkarni

आदर्श कृषि खरेदी-विक्री संस्थेच्या फोंडा व वाळपई शाखेचे 24 रोजी उद्घाटन

Amit Kulkarni

सुसंस्कृत समाजासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज

Patil_p
error: Content is protected !!