सात वर्षांच्या खंडानंतर सप्टेंबरअखेरीस होणार स्पर्धा
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन गुजरातमध्ये करणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी शुक्रवारी जाहीर केले. 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन गुजरातमध्ये प्रथमच केले जात असल्याचे राज्याचे क्रीडा, सांस्कृतिक खात्याचे मुख्य सचिव अश्वनी कुमार यांनी सांगितले. ‘गुजरातने या स्पर्धेच्या आयोजनाचा मांडलेला प्रस्ताव भारतीय ऑलिम्पिक संघटनेने मान्य केला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे,’ असे मुख्यमंत्री पटेल यांनी सकाळी ट्विटच्या माध्यमातून सांगितले. गुजरातमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याने ही स्पर्धा सर्वोत्तम होण्यासाठी कोणतीही कसर ठेवली जाणार नाही, असेही ते म्हणाले.
या स्पर्धेतील विविध क्रीडा प्रकार अहमदाबाद, गांधीनगर, सुरत, बडोदा, राजकोट, भावनगर या सहा शहरात घेतले जाणार आहेत. 34 क्रीडा प्रकारात 7000 हून अधिक क्रीडापटू आपले कौशल्य दाखवणार आहेत. याआधीची शेवटची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा केरळमध्ये 2015 साली आयोजित करण्यात आली होती. वेगवेगळय़ा कारणांमुळे या स्पर्धेत सात वर्षांचा खंड पडला. त्यात कोरोना महामारीचाही समावेश असल्याचे राज्याचे क्रीडामंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले.