@ इटानगर, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अरुणाचल प्रदेशातील चीनच्या सीमेवर तैनात असलेले भारतीय लष्कराचे जवान प्रकाश सिंह राणा आणि हरेंद्र नेगी गेल्या 13 दिवसांपासून बेपत्ता आहेत. सदर दोन्ही जवान उत्तराखंडमधील रहिवासी आहेत. उत्तराखंडचे दोन जवान भारतीय सीमेवरून बेपत्ता झाल्याचे वृत्त शनिवारी सर्वदूर झाले. बेपत्ता झालेले दोन्ही जवान अरुणाचल प्रदेशातील 7-गढवाल रायफल्समध्ये तैनात होते. ते चीन सीमेवरील ठकाला पोस्टवर तैनात होते. यासंबंधी भारतीय लष्कर चिनी लष्करी अधिकाऱयांशीही संपर्क साधत आहे.
28 मे पासून दोन्ही सैनिकांबद्दल काहीही माहिती उपलब्ध झालेली नाही. दोन्ही जवान उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे, तर एकाचे कुटुंब सध्या डेहराडून जिह्यात राहत आहे. चीन सीमेवरून बेपत्ता होऊन 13 दिवस उलटूनही या दोघांची खबर न लागल्याची बाब केंद्रीय संरक्षण मंत्रालयापर्यंत कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. दोन्ही जवानांचा शोध सुरू असल्याचे लष्कराकडून सांगण्यात येत आहे. इकडे राज्य सरकारही लष्कराशी संपर्क साधत आहे.
रुद्रप्रयाग येथील रहिवासी असलेले भारतीय लष्कराचे जवान हरेंद्र नेगी बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यापूर्वी जवान प्रकाश सिंह राणा बेपत्ता झाल्याची बातमी आली होती. दोघेही रुद्रप्रयागचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे, तर राणाचे कुटुंब देहराडून जिह्यातील प्रेमनगर येथील आंबीवाला भागात राहते. 34 वषीय जवान प्रकाश राणा यांनी 28 मे रोजी आपल्या पत्नीशी व्हिडीओ कॉलद्वारे अखेरचा संवाद साधला होता. त्यापासून त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. राणा यांची खबर न मिळाल्याने त्यांची पत्नी आणि दोन मुले चिंतातूर झाली आहेत. आता लष्करी पातळीवरून त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यानुसार 7-गढवाल रायफल युनिटमधून राणा बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे.
राज्य सरकार लष्कराच्या संपर्कात
या जवानांच्या कुटुंबीयांच्या विनंतीनंतर राज्य सरकारने भारतीय लष्कराशी संपर्क साधला आहे. आपण लष्करी अधिकाऱयांच्या संपर्कात असल्याचे राज्याचे सैनिक कल्याण मंत्री गणेश जोशी यांनी सांगितले. याचदरम्यान सहसपूरचे आमदार सहदेव सिंह पुंडीर यांनी राणा यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री आणि उत्तराखंडचे खासदार अजय भट्ट यांनाही जवान बेपत्ता झाल्याची माहिती देण्यात आली आहे.