प्रतिनिधी /कोल्हापूर
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना, संजय घोडावत विद्यापीठ व कोल्हापूर चेस असोसिएशन यांच्या वतीने अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील घोडावत विद्यापीठात 26 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान एमपीएल 48 व्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन होत आहे. यामध्ये 3 आयएमसह 8 महिला ग्रँडमास्टर, 11 महिला आंतरराष्ट्रीय मास्टर व 12 महिला आंतरराष्ट्रीय फिडे मास्टर यांच्यासह नामांकित 110 बुद्धिबळपटूंचा सहभाग असणार आहे, अशी माहिती घोडावत विद्यापीठाचे डॉ. कुलगुरु डॉ. अरुण पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
अधिक माहिती देताना डॉ. पाटील म्हणाले, स्विस लीग पद्धतीने एकूण 11 फेऱयांमध्ये या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन होत आहे. या स्पर्धेसाठी महिला ग्रँडमास्टर वंटीका अगरवालला (दिल्ली) अग्रमानांकन तर गतविजेती महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुखला द्वितीय मानांकन मिळाले आहे. तसेच माजी विजेती व पीएससीबीची आयएम सौम्या स्वामीनाथनला तिसरे व महिला ग्रँडमास्टर व माजी विजेती मेरी ऍना गोम्सला चतुर्थ मानांकन मिळाले आहे. नुकताच अर्जुन पुरस्कार मिळालेली आयएम व माजी विजेत्या भक्ती कुलकर्णीला (गोवा) पाचवे, कोल्हापूरची आयएम ऋचा पुजारीला आठवे मानांकन मिळाले आहे.
कोल्हापुरात प्रथमच राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा…
राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यास नाशिक बुद्धिबळ असोसिएशनने तयारी दर्शवली होती. मात्र उद्योगपती संजय घोडावत व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष गिरीष चितळे यांनी अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेकडे पाठपुरावा करुन कोल्हापूरकडे स्पर्धेचे संयोजन खेचून आणले आहे. त्यामुळे प्रथमच कोल्हापूरला राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. 25 डिसेंबरला सायंकाळी स्पर्धेचे उद्घाटन होईल. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रॅण्डमास्टर अभिजीत कुंटे उपस्थित राहणार आहेत.