युद्ध अनेक वर्षे चालण्याची शक्यता व्यक्त, युरोपियन देश निर्णायकरित्या युक्रेनच्या पाठीशी
नाटो देशांनी आता संयुक्तरित्या रशियावर दबाव आणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या आधारे नाटो देशांचा संयुक्त युद्ध सराव लवकरच सुरु होणार असून त्या युपेनची सैन्यदलेही समाविष्ट होण्याची शक्यता आहे. रशियाला वारंवार आवाहन करुनही तो देश युद्ध थांबविण्यास तयार नाही. तसेच युक्रेनमधून आपली सेना काढून घेण्यास तयार नाही, अशा स्थितीत रशियावर सामरिक दबाव आणणे हा एकमेव मार्ग उरला असल्याचे युरोपियन देशांनी स्पष्ट केले आहे.
युद्धास प्रारंभ होऊन आता जवळपास 10 आठवडे होत आहेत. तरीही ते थांबण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. रशिया आपल्या आक्रमणाची व्याप्ती वाढवत आहे. परिणामी, युद्ध अधिक चिघळत चालले आहे. त्यामुळे आता रशियाशी दोन हात करण्यास युरोपियन देशांना सज्ज व्हावे लागणार आहे. युक्रेनला उघडपणे पार्ठिबा देऊन रशियाला थोपविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
युद्ध सरावाची योजना
नाटो देशांच्या सेनांचे सहस्रावधी सैनिक युद्ध सरावासाठी सज्ज करण्यात येत आहेत. हा सराव केवळ एकदा किंवा दोनदा होणार नाही, तर अशा सरावांची मालिकाच होणार आहे. या सरावात भूसैनिकांसमवेत युद्ध विमाने, हेलिकॉप्टर्स, क्षेपणास्त्र प्रणाली, अत्याधुनिक संपर्कसाधने, तोफ यंत्रणा, चिलखती गाडय़ा आदींचाही समावेश असेल. या सरावाच्या निमित्ताने नाटो आपले सामरिक सामर्थ्य रशियाला दाखवून देणार आहे. रशियाची यावर प्रतिक्रिया कशी होईल यावर युद्धाचे भवितव्य अवलंबून राहील, असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे.
कीव्हवर हल्ल्याची कबुली
संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव गुट्रेस हे युक्रेनची राजधानी कीव्हला भेट देण्यासाठी आले असताना कीव्हवर बाँबफेक केल्याची कबुली रशियाने दिली आहे. दोन आठवडय़ांपूर्वी हा हल्ला करण्यात आला होता. त्यात एका महिला पत्रकाराचाही मृत्यू झाला होता. या पत्रकार निवासास असणाऱया इमारतीवर रशियन क्षेपणास्त्र आदळले होते आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
तर युद्ध चिघळेल
नाटो किंवा युरोपियन देशांनी उघडपणे युक्रेनची बाजू घेऊन रशियावर दबाव आणल्यास युद्ध चिघळल्याशिवाय राहणार नाही. रशिया आपल्या प्रतिष्ठेसाठी आणि न्याय्य अधिकारांसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, अशी भाषा रशियाने केली आहे. नाटोने या युद्धात थेट सहभाग घेतल्यास हे युद्ध युरोपापर्यंत पसरु शकते आणि त्यामुळे अपरिमित हानी होणार असून त्याची जबाबदारी युरोपियन देशांवर असेल, असा इशाराही रशियाने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पाठिंबा बेकायदेशीर
नाटोने युक्रेनला दिलेला पाठिंबा बेकायदेशीर आहे. हे युद्ध हा युक्रेन आणि रशियाचा प्रश्न आहे. त्यात नाटोने हस्तक्षेप करु नये. तसा केल्यास रशियाला वेळप्रसंगी अण्वस्त्रांचाही उपयोग करावा लागेल, अशी धमकी रशियाने गुरुवारीच दिली होती. तर, रशियाचा आता धीर सुटत चालला आहे. त्यामुळे तो अशी भाषा करीत आहे, अशी प्रतिक्रिया काही नाटो देशांनी व्यक्त केली होती. नाटो देशांनी युद्ध सराव केल्यास आगीत तेल ओतल्यासारखे होईल आणि युद्धाची व्याप्ती वाढण्यास वेळ लागणार नाही, असेही रशियाने बजावले आहे. अमेरिकेने रशियाच्या नागरीकांची रशियातील मालमत्ता ताब्यात घेणेही बेकायदेशीर असून रशिया त्याविरोधात दाद मागितल्या शिवाय राहणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.
युद्ध भडकणार
ड युक्रेन-रशिया युद्धाचा शेवट बराच काळ लांबण्याची आहे दाट शक्यता
ड अमेरिकेच्या अध्यक्षांची युक्रेनला आणखी शस्त्रपुरवठा करण्याची तयारी
ड संयुक्त युद्धसराव नाटो देशांनी केल्यास परिणाम गंभीर ः रशिया
ड रशियाला एकटे पाडण्यासाठी अमेरिका-युरोपियन देशांचे डावपेच