कोलंबो / वृत्तसंस्था
भारताचे नौसेनाप्रमुख आर. हरिकुमार यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंगे यांच्याशी द्विपक्षीय संरक्षण सहकार्यासंबंधी चर्चा केली आहे. हरिकुमार बुधवारी चार दिवसांच्या श्रीलंकेच्या दौऱयावर कोलंबो येथे पोहचले. त्यांनी रानिलसिंगे यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणी केली. चर्चेच्या वेळी श्रीलंकेचे वरिष्ठ संरक्षण आणि राजकीय अधिकारीही उपस्थित होते. दोन्ही देशांच्या संरक्षण सहयोगाला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने ही चर्चा झाल्याचे प्रतिपादन नंतर भारतीय नौदलाच्या वतीने करण्यात आले. श्रीलंकेतील भारतीय उच्चायोगाच्या वतीनेही ही माहिती ट्विटरवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
हिंदी महासागर क्षेत्रात शांतता राखणे आणि संरक्षणसंबंधी सहकार्य करणे या मुद्दय़ांवर दोन्ही बाजूंकडून भर देण्यात आला होता. श्रीलंकेशी भारताचे संरक्षण विषयक संबंध अनेक दशकांपासून आहेत. ते अधिक बळकट कसे करता येतील, यावर चर्चा झाली. दोन्ही देशांच्या सेनादलांमध्ये आतापर्यंतच्या सहकार्यासंबंधीचा आढावा घेण्यात आला, अशीही माहिती उच्चायोगाकडून देण्यात आली आहे.