वृत्तसंस्था/ केंट (ब्रिटन)
भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीबरोबर इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱया केंट क्रिकेट क्लबने नुकताच नवा करार केला आहे. 2022 च्या इंग्लिश कौंटी क्रिकेट हंगामातील उर्वरित सामन्यांसाठी सैनी केंटचे प्रतिनिधीत्व करेल.
इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासाठी सैनीला व्हिसा उपलब्ध करून देण्यात आला आहे. आता या इंग्लिश कौंटी क्रिकेट हंगामातील केंटच्या उर्वरित तीन सामन्यांमध्ये सैनीचा समावेश राहिल. राष्ट्रीय क्रिकेटमध्ये सैनी दिल्लीचे प्रतिनिधीत्व करीत असून नुकत्याच झालेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत तो राजस्थान रॉयल संघाकडून खेळला होता. इंग्लंडमधील इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत अलीकडच्या कालावधीत भारताच्या चेतेश्वर पुजारा, वॉशिंगटन सुंदर, कृणाल पंडय़ा आणि उमेश यादव यांनी विविध क्लबबरोबर करार केला होता. सैनी पुढील आठवडय़ात केंट संघाकडून वॉर्विकशायर क्लबविरुद्ध होणाऱया सामन्यात आपले इंग्लिश कौंटी क्रिकेट पदार्पण करणार आहे.