ऑनलाईन टीम / तरुण भारत :
बनावट जात दाखल्याच्या प्रकरणात मुंबईतील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना बजावलेल्या अजामीनपात्र अटक वॉरंटची अंमलबजावणी करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे नवनीत राणांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
या प्रकरणात नवनीत राणा आणि त्यांचे वडील हरभजन रामसिंग यांच्याविरोधात विशेष न्यायदंडाधिकारी न्यायालयाचे न्यायाधीश पी. आय. मोकाशी यांनी 21 ऑक्टोबरला अजामीनपात्र अटक वॉरंटच्या अंमलबजावणीचे निर्देश दिले होते. मात्र, याविरोधात नवनवनीत राणा यांनी सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत वॉरंटची अंमलबजावणी करणार नसल्याची भूमिका पोलिसांनी घेतली होती. त्यामुळे राणा यांना दिलासा मिळाला होता.
बुधवारी सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी राणा व सिंग यांचा फेरविचार अर्ज फेटाळून लावला. त्या पार्श्वभूमीवर न्या. मोकाशी यांच्यासमोर याप्रश्नी पुन्हा सुनावणी झाली. त्यावेळी नवनीत राणा या संसद अधिवेशनामुळे दिल्लीत असल्याने सुनावणीला हजर राहू शकल्या नाहीत तसेच त्यांचे वडील सध्या तीर्थयात्रेवर आहेत, असं राणांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. त्यावर न्या. मोकाशी यांनी नाराजी व्यक्त करत वॉरंटचा आदेश पुन्हा देण्याची गरज आहे का? असा खडा सवाल पोलिसांना केला. त्यानंतर सिंग यांच्याविरोधात लवकरच वॉरंटची अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही न्यायालयात उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने न्यायालयाला दिली.