तालुक्यात दौडला उत्साहात सुरुवात : नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन
प्रतिनिधी /खानापूर
शहरात नवरात्रोत्सवाला सोमवारी भक्तिभावाने प्रारंभ झाला. अर्बन बँक चौक, विद्यानगर, शाहूनगर, हलकर्णी दुर्गा मंदिर, महालक्ष्मी देवस्थान, पोलीस प्रशिक्षण केंद्र दुर्गा मंदिर या ठिकाणी नवरात्र उत्सवाला मोठय़ा भक्तिभावाने सुरुवात झाली. सोमवारी घटस्थापनेदिवशी पहाटे महालक्ष्मी मंदिर, दुर्गा मंदिर येथे विधिवत अभिषेक, पूजा करून घटस्थापना करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी स्थापन करण्यात येणाऱया दुर्गादेवी मूर्तींची मिरवणूक काढून पूजा करून स्थापना करण्यात आली. नऊ दिवस येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
अर्बन बँक चौकातील दुर्गादेवी मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक विठोबादेव गल्ली, बेंद्रे खुट, चिरमुरकर गल्ली, देसाई गल्लीमार्गे अर्बन बँक चौकात पोहोचताच दुर्गादेवीचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. यानंतर दुर्गादेवीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. येथे रोज सकाळी 8.30 वा. देवीची विधिवत पूजा-अर्चा, आरती तसेच रात्री 8.30 वा. महाआरती आयोजित केली आहे. आकर्षक मंडपाला विद्युत रोषणाई केली आहे. अध्यक्ष आर. पी. जोशी, सेक्रेटरी दिनकर मरगाळे, सुनील पानेरी, प्रशांत खासनिस, रणजीत जाधव, कुमार महाजन आदी पदाधिकाऱयांच्या हस्ते आरती करण्यात आली.
येथील विद्यानगर दुर्गादेवी उत्सवाला प्रारंभ करण्यात आला. सोमवारी शहरातील विविध मार्गांवरून दुर्गादेवीची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये महिलावर्ग मोठय़ा संख्येने सहभागी झाला होता. सायंकाळी विद्यानगरमध्ये भव्य मंडपात दुर्गादेवीची प्रतिष्ठापना केली असून नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यावेळी सुनीता मयेकर, सुमित्रा तळवार, वनिता नाईक, कविता यळ्ळूरकर, माया कवचे, सविता मजली, जया बागेवाडी, अर्चना तिरवीर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. राजर्षि शाहूनगर वसाहतीमधील दुर्गादेवी उत्सवालाही प्रारंभ झाला आहे. हलकर्णी येथील दुर्गा मंदिरात अभिषेक, पूजा करून नवरात्रोत्सवाला सुरुवात
झाली.
नवरात्रीनिमित्त शहरातील सर्व मंदिरांना विद्युतरोषणाई केली आहे. ग्रामदेवता लक्ष्मी मंदिरातील लक्ष्मीदेवी मूर्तीलाही सजविण्यात आले आहे. गाभाऱयात आकर्षक सजावट केली आहे. दररोज देवीला वेगवेगळय़ा अलंकारित वेशभूषेने सजविले जाणार आहे. शहराचे मूळ स्थान असलेल्या सातेरी माउली देवी, चौराशी मंदिरात नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून दररोज सायंकाळी 7.30 वा. महाआरतीचे आयोजन केले आहे. बसवेश्वर मंदिरातील नाडहब्ब उत्सवालाही प्रारंभ झाला
आहे.
अर्बन बँक चौकातील दुर्गादेवीसमोर मंगळवारपासून रात्री 9 ते 11 या वेळेत दांडियाचे आयोजन केले आहे. विद्यानगर येथेही दांडिया होणार आहे. इनरव्हील क्लबतर्फे तीन दिवस दांडियाचे आयोजन करण्यात येणार आहे.
दुसऱया दिवशीही दुर्गादौडला नंदगड येथे उदंड प्रतिसाद
येथे शिवप्रति÷ान हिंदुस्थानतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे घटस्थापनेपासून दुर्गादौड काढण्यात येत आहे. मंगळवारी दुसऱया दिवशीही दौडीला उदंड प्रतिसाद मिळाला.
लहान मुला-मुलींसह युवकांनी उपस्थिती दर्शवली होती. नियोजित लक्ष्मीदेवी मंदिरात पहाटे साडेपाच वाजता आरती होऊन दौडीला सुरुवात झाली. मठ गल्ली, सोनार गल्ली, विठोबा गल्ली, कॉलेज रोड, सानिकोप्प गल्ली, तेली गल्ली, मेदर गल्ली, घोलम गल्लीतून दौड निघाली. ठिकठिकाणी आरती ओवाळून दौडीचे स्वागत करण्यात आले. दौडीत सहभागी झालेल्यांनी जयजयकाराच्या घोषणा दिल्या. राम मंदिरसमोर आरतीने दौडीची सांगता झाली.
दारोळी येथे दुर्गादौडला उत्साहात प्रारंभ
दारोळी येथे यावर्षी दुर्गामाता दौडला सुरुवात केली आहे. खानापूर व बेळगाव येथील शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दुर्गम भागात दौड सुरू करण्याबाबत काही दिवसांपासून प्रयत्न सुरू केले होते. त्याप्रमाणे दुर्गम भागातही दौड मोठय़ा उत्साहात सुरू झाली आहे. दारोळी येथेही दुर्गामाता दौड सुरू आहे. पहाटे 5 वाजता मरुबाई मंदिरात ध्वजाचे पूजन होऊन दौडला सुरुवात झाली. स्थळदेव मंदिरात येऊन दौडची समाप्ती झाली. या दौडमध्ये गावातील युवा-युवती तसेच ज्येष्ठ नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. गावात रांगोळी, भगवा पताका व तोरण, ध्वजांनी गाव उत्सवमय झाले हेते.
कसबा नंदगड येथे दुर्गामाता दौडचा उत्साह
तालुक्यातील कसबा नंदगड येथे दुर्गामाता दौडला मोठय़ा उत्साहात सुरुवात झाली आहे. पहाटे शिवमूर्तीला अभिषेक, पूजा करून मंदिरांना भेटी देत श्री शिवाजी व संभाजी महाराजांच्या जयघोषात दौडीत युवक, युवती, महिला सहभागी होत आहेत. गावात रांगोळी, पताकांनी स्वागत करण्यात आले.
सुहासिनींनी ध्वजाची आरती केली. गावात गेल्या अनेक वर्षांपासून दुर्गामाता दौड काढण्यात येते. महेश पाटील दुर्गामाता दौडीचे नियोजन करत आहेत. शिवस्मारक येथे दौडीची सांगता करण्यात आली. यावेळी परशराम पाटील, महादेव बरगावकर, मंजू धबाले, गणेश पाटील, महेंद्र पाटील, सुरेश करडी, भूषण करडी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. गावातील मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विजयादशमीपर्यंत भजन, कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत.