तीन वर्षांनी मायदेशात पोहोचणार
वृत्तसंस्था/ लंडन
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे पुढील वर्षी जानेवारीमध्ये पाकिस्तानात परतणार आहेत. तीन वर्षांनी शरीफ हे मायदेशात पोहोचणार असून 2023 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करणार आहेत. नवाज शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (पीएमएल-एन)चे वरिष्ठ नेते आणि आर्थिक विषयक मंत्री सरदार अयाज सादिक यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.
पाकिस्तानात पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. नवाज शरीफ हे पक्षप्रमुख म्हणून उमेदवारांची नावे निश्चित करणार आहेत. तर सार्वत्रिक निवडणूक मार्च महिन्यात घेण्यात यावी, अशी मागणी माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)चे अध्यक्ष इम्रान खान करत आहेत. परंतु सत्तारुढ पीएमएल-एन आणि त्याच्या सहकारी पक्षांनी घटनेनुसार ऑगस्ट महिन्यानंतरच निवडणूक करविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
लाहोर उच्च न्यायालयाने 2019 मध्ये नवाज यांना उपचारासाठी 4 आठवडय़ांकरता विदेशी जाण्याची अनुमती दिली होती. 19 नोव्हेंबर 2019 रोजी नवाज हे लंडनमध्ये पोहोचले होते आणि तेव्हापासून ते मायदेशी परतले नव्हते. न्यायालयाने 2018 साली अल-अजीजिया स्टील मिल्स भ्रष्टाचार प्रकरणी नवाज यांना दोषी ठरवत 7 वर्षांची शिक्षा सुनावली होती. तर एवनफील्ड प्रॉपर्टी प्रकरणी त्यांना 11 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तसेच 80 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.