महिला व्यक्तिरेखेतील पोस्टर सादर
नवाजुद्दीन सिद्दीकी हा दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. नवाजुद्दीनने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये आठवणीत राहतील अशा भूमिका साकारल्या आहेत. तो आता लोकांसाठी नवा चित्रपट ‘हड्डी’ घेऊन येतोय. यात नवाजने अत्यंत वेगळय़ा प्रकारची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील त्याचे पोस्टर पाहून लोकांना अर्चना पूरन सिंहची आठवण येत आहे.


‘हड्डी’ हा चित्रपट झी स्टुडिओज, आनंदिता स्टुडिओज (राधिका नंदा, संजय साहा) यांनी मिळून तयार केला आहे. अक्षत अजय शर्मा यांच्याकडून याचे दिग्दर्शन करण्यात आले आहे. तर याची कहाणी अक्षत अजय शर्मा आणि अदम्य भल्ला यांनी लिहिली आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाले असून हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपटातील नवाजुद्दीनची पहिली झलक समोर आली आहे.
नवाजुद्दीन यात एका महिलेच्या भूमिकेत दिसून येतोय. बॉडीकॉन ड्रेस अन् फुल ऑन मेकअपमध्ये नवाजुद्दीनला ओळखणे अवघड आहे. ‘हड्डी’मधील माझी भूमिका अनोखी आणि विशेष असेल. या चित्रपटात मी आतापर्यंत कधीच न पाहिले गेलेल्या लुकमध्ये दिसून येणार आहे. एक अभिनेता म्हणून माझी क्षमता वाढविण्यास यामुळे मदत होणार असल्याचे नवाजुद्दीनने म्हटले आहे.
नवाजुद्दीन यापूर्वी ‘हीरोपंती 2’ या चित्रपटात दिसून आला होता. कंगना रनौतचा चित्रपट ‘टीकू वेड्स शेरू’मध्ये तो काम करत आहे. याचबरोबर त्याच्याकडे ‘नूरानी चेहरा’, ‘बोले चूडियां’, ‘जोगीरा सारा रा रा’, ‘संगीन’ आणि अफवाह’ हे चित्रपट आहेत.