आठ जवानांना शौर्य चक्र, दोघांना मरणोत्तर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शौर्य पुरस्कारांची घोषणा केली. या स्वातंत्र्यदिनी नायक देवेंद्र प्रताप सिंह यांना किर्ती चक्र हा दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला. तसेच सैन्यातील 8 सैनिकांना शौर्य चक्र प्राप्त झाले. शिपाई कर्णवीर सिंह आणि गनर जसबीर सिंग यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झाले आहे. नायक देवेंद्र प्रताप सिंह यांनी 29 जानेवारी रोजी पुलवामा येथे झालेल्या मोहिमेत सहभागी होत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.
लष्करातील 8 जवानांना शौर्य चक्र प्रदान करण्यात येणार आहे. यापैकी शिपाई कर्णवीर सिंह आणि रायफलमॅन जसबीर सिंग यांना मरणोत्तर शौर्य चक्र देण्यात येणार आहे. याशिवाय शौर्य चक्र पुरस्कार विजेत्यांमध्ये मेजर नितीन धानिया, अमित दहिया, संदीप कुमार, अभिषेक सिंह, हवालदार घनश्याम आणि लान्स नायक राघवेंद्र सिंह यांचा समावेश आहे.
लष्कराच्या डॉग ऍक्सेलचा गौरव


भारतीय लष्कराच्या ऍसॉल्ट डॉग ऍक्सेलला मरणोत्तर ‘मेन्शन इन डिस्पेचेस’ हा शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवाईत श्वानाने बजावलेल्या महत्त्वपूर्ण सहभागासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.