पुणे / प्रतिनिधी :
‘पवार ही या देशाला लागलेली कीड आहे’, असे वक्तव्य करत आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार आडनाव असलेल्या अठरापगड जाती-धर्मातील विविध कुटुंबीयांचा व त्यांच्या जातीचा अवमान केला आहे. त्यामुळे याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानेपुणे शहर पोलीस आयुक्तांची भेट घेतली.
इंदापूर येथील जाहीर सभेत “पवार हे या देशाला लागलेली कीड आहे”, असे वक्तव्य पडळकर यांनी केले होते. पवार आडनाव असलेल्या अठरापगड जाती -धर्मातील विविध कुटुंबीयांचा व त्यांच्या जातीचा पडळकर यांनी अवमान केला आहे.यापैकी आदिवासी व मागासवर्गीय या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी वडार समजाचे महेश पवार व घिसाडी समाजाचे माधव पवार यांनी त्यांच्या आडनाव व समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. ज्या गुन्ह्याअंतर्गत राहुल गांधींना दोषी ठरविण्यात आले, तोच गुन्हा गोपीचंद पडळकर यांच्यावर दाखल करावा व आम्हालादेखील न्याय मिळावा, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त यांच्याकडे केली.
याशिवाय अधिवेशनातील शेवटच्या दिवशी विधान परिषदेत झालेल्या भाषणातही पडळकर यांनी काही आक्षेपार्ह विधाने केली आहेत. लवासा, बारामती व मगरपट्टा ही तीन वेगवेगळी राज्ये करण्यात यावीत. या तिन्ही राज्यांचे वेगवेगळे मुख्यमंत्री असावेत आणि या तिन्ही राज्यांचा मिळून एक वेगळा देश निर्माण करावा, ज्याचे पंतप्रधान पवार साहेबांना करावे, असे वक्तव्य करत देशाचे तुकडे करण्याची भाषाही त्यांनी केली आहे. त्यांचे हे वक्तव्य भारताच्या संघराज्य व्यवस्थेला छेद देणारे असून याबाबत गोपीचंद पडळकर यांच्यावर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असेही यात म्हटले आहे. पुणे शहर पोलीस आयुक्त या घटनेचा गांभीर्याने विचार करून यावर कार्यवाही करतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.
सदर शिष्टमंडळात प्रवक्ते प्रदीप देशमुख , किशोर कांबळे , महेश पवार , माधव पवार , मधुकर पवार , महेश हंडे , शशिकांत जगताप , दिपक कामठे , शुभम मताळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.