Tarun Bharat

राष्ट्रवादीची उर्वरीत मते शिवसेनेच्या उमेदवाराला

शरद पवार यांची गुगली : संभाजीराजे छत्रपती खिंडीतून कोंडीत : शिवबंधन बांधण्याशिवाय पर्याय नाही

Advertisements

प्रतिनिधी/मुंबई, पुणे, कोल्हापूर

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी होणाऱया निवडणुकीत राष्ट्रवादीची उर्वरीत मते शिवसेनेचा जो उमेदवार असेल त्यालाच उमेदवाराला देण्यात येतील, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात जाहीर केले. पवार यांच्या गुगलीनंतर संभाजीराजे छत्रपती खिंडीतून कोंडीत सापडले आहेत. शिवसेनेने पक्ष प्रवेशाच्या ऑफरवर संभाजीराजे यांनी भाष्य केले नव्हते. आता मात्र पवार यांनी राष्ट्रवादीची भूमिका जाहीर केल्यानंतर संभाजीराजेंना निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यातच शिवसेनेने सोमवारपर्यंतची डेडलाईन दिल्याने संभाजीराजे नेमकी काय भूमिका घेतात? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी इच्छुक असणाऱया संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून गेले काही दिवस राजकीय हालचाली वेगाने सुरू आहेत. शनिवारी विविध घडामोडी घडत असताना सायंकाळी शरद पवार यांनी थेट राष्ट्रवादीची भूमिका जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

पुण्यात ब्राम्हण समाजाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले, आमच्या पक्षापुरता निर्णय सांगतो. एक जागा निवडून येण्यासाठी आवश्यक असणारी मत आमच्याकडे आहेत. दोन वर्षापूर्वी राज्यसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी आम्हाला एक जागा मिळत होती. त्यावेळी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दुसरी जागा मागितली होती. ती त्यांनी मान्य केली होती. माझी आणि फौजिया खान अशी ती निवडणूक होती. त्यामुळे आता आमची उरणारी मते शिवसेनेचा जो उमेदवार असेल, त्यांना असेल. मग त्या ठिकाणी संभाजीराजे असोत किंवा आणखी कोण असो, त्याला द्यावी लागतील, असे शरद पवार म्हणाले.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा संभाजीराजे यांना जाहीर केला होता. त्यानंतर संभाजीराजे यांनी सर्व पक्षांना पाठिंब्यासाठी आवाहन केले होते. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, त्यांना उमेदवारी देण्यात येईल, असा प्रस्ताव दिला होता. पण संभाजीराजे अपक्ष लढण्यावर ठाम होते. पण आता शरद पवार यांनी राष्ट्रवादीची उर्वरीत मते सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या उमेदवाराला दिली जातील, असे स्पष्ट करून संभाजीराजेंची शिवसेनेच्या मदतीने कोंडी केली आहे. सोमवारपर्यंत निर्णय कळवा अन्यथा दुसऱया उमेदवाराला संधी देवू हे शिवसेनेने स्पष्ट केल्याने दोन दिवसांत संभाजीराजेंना निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यांच्यापुढे शिवसेना प्रवेश किंवा अपक्ष लढणे हेच दोन पर्याय राहणार आहे. अपक्ष लढण्यास निवडणूक सोपी नाही, हे ते जाणत असल्याने त्यांच्या निर्णयाकडे साऱया राज्याचे लक्ष लागले आहे.

मराठा क्रांती मोर्चा संभाजीराजेंसाठी मैदानात

मराठा क्रांती मोर्चा संभाजीराजेंसाठी मैदानात उतरला आहे. सर्व पक्षांनी विना अट संभाजीराजे यांना बिनविरोध, विनाअट राज्यसभेवर निवडून देवून राज्यात वेगळा पायंडा पाडावा, असे आवाहन सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या महाआघाडीसह विरोधी भाजपच्या नेत्यांना केले आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी इंदापूर येथे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षात शाहूंच्या वारसाला बिनविरोध राज्यसभेवर जाण्याची संधी दिल्यास राज्यात चांगला संदेश जाईल, यासाठी भाजपने संभाजीराजेंच्या अपक्ष उमेदवारीला पाठबळ द्यावे, अशी विनंती केली. मराठा क्रांती मोर्चाच्या ठाणे येथील राज्य समन्वयकांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवसेनेने संभाजीराजेंच्या उमेदवारीला विनाअट पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली.

संभाजीराजेंना सोमवारपर्यंतची डेडलाईन
संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, शिवसेनेच्या उमेदवारीवर राज्यसभा निवडणूक लढावावी, अशी ऑफर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच दिली आहे. संभाजीराजे यांचा निर्णय सोमवारपर्यत झाला नाही, तर इतरांना संधी देण्याचे शिवसेनेने निश्चित केले आहे. ऐनवेळी चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्यसभेत जायचे असे तर संभाजी राजे यांनी शिवसेनेत यावे ः संजय राऊत
छत्रपती संभाजी राजेना राज्यसभेत जायचे असेल तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा. सहावी जागा शिवसेनेची आहे. संभाजीराजेंसाठी शिवसेना ही जागा सोडणार नाही. मात्र राजेंना राज्यसभेवर जायचे असेल तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

शनिवारच्या राजकीय घडामोडी आणि विधाने
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-संजय राऊत चर्चा
सहावी जागा शिवसेना सोडणार नाही ः राऊत
संभाजीराजेंनी शिवसेनेत यावे तरच उमेदवारी ः राऊत
शिवसेना नेत्यांना राज्यसभेवर संधी द्या ः अपक्ष आमदार
संभाजीराजेंना भाजपने पाठिंबा द्यावा ः राजेंद्र केंढरे
चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावाची चर्चा
सोमवारपर्यंत राजेंचा निर्णय न आल्यास इतरांना संधी ः शिवसेना
राष्ट्रवादीची उर्वरीत मते शिवसेनेच्या उमेदवाराला ः शरद पवार

Related Stories

रजनीकांत यांनी पुरस्कार अर्पण केलेले राज बहादूर आहेत तरी कोण?

Abhijeet Shinde

विद्यार्थी त्यांच्या इच्छेनुसार लस घेऊ शकतात : उपमुख्यमंत्री

Abhijeet Shinde

भुयारी गटर योजना पूर्ण होणार केव्हा?

Patil_p

सातारा तालुका शिवसेनेच्यावतीने वर्धापन दिन

Patil_p

हिमाचल प्रदेश : माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

Rohan_P

भारतात कोरोनाबाधितांनी ओलांडला 2 लाखाचा टप्पा

datta jadhav
error: Content is protected !!