Tarun Bharat

राष्ट्रवादीचा संकल्प २०२४ चा, स्वबळासह मुख्यमंत्री करण्याचा निर्धार

Advertisements

कोल्हापूर/कृष्णात चौगले

विदर्भातून सुरु झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेचा कोल्हापूरात समारोप झाला. राज्यभरातील हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने झालेल्या भव्य संकल्प सभेमध्ये राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याचा संकल्प सोडला. परिवार संवाद यात्रेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आलेल्या अनुभवातून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी रोडमॅप निश्चित केला असून राष्ट्रवादी हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष करण्याचे संकेत दिले. भाजप हाच प्रमुख विरोधी पक्ष असल्याचे स्पष्ट करून पुरोगामी महाराष्ट्राचा नारा देत राष्ट्रवादीने आगामी निवडणूकांचा अजेंडा स्पष्ट केला. राज्याच्या विकासाची दृष्टी ठेवून महागाई, बेरोजगारीवरून केंद्रात असलेल्या भाजप सरकारला कोंडीत पकडण्याचे संकेत परिवार संवाद यात्रेच्या समारोपातून दिलेत.


परिवार संवाद यात्रा मार्च 2020 मध्ये विदर्भातून सुरु झाली. विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि नागपूर विभाग अशा पाच टप्प्यात ही यात्रा पार पडली. 255 विधानसभा मतदारसंघ, 353 तालुक्यांमध्ये 15 हजार किलोमीटरचा प्रवास झालेल्या या यात्रेमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या संघटनात्मक बांधणीची काय स्थिती आहे ? कोण पक्षासाठी योगदान देतो ? गटाताटासाठी कोण काम करत आहे ? बुथ कमिटय़ांची काय स्थिती आहे ? याचा लेखाजोखा तयार झाला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसह 2024 ते 2034 पर्यंतच्या विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना पक्ष बांधणीचा रोडमॅप तयार झाला आहे. यामध्ये पक्ष हिताऐवजी गटातटाचे राजकारण करणाऱयांना जागा दाखवली जाणार असून जे पक्षासाठी वेळ देतात अशा सर्वसामान्य कुटूंबातील युवकांना संधी देऊन नवीन नेतृत्व निर्माण केले जाणार आहे. राष्ट्रवादीची आगामी राजकीय वाटचाल या रोडमॅपनुसारच होणार असल्याचे संकल्प सभेत स्पष्ट झाले.

महाविकास आघाडी होईल, पण मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच


2024 ची विधानसभा निवडणूक हेच राष्ट्रवादीच्या संकल्प सभेचे लक्ष्य होते. या निवडणुकीत सध्याची महाविकास आघाडी कायम राहील. पण त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असेल आणि मुख्यमंत्रीही राष्ट्रवादीचाच असा सूर सभेत उपस्थित असलेल्या नेत्यांनी भाषणातून आळवला. आघाडीच्या माध्यमातून ज्या जागा मिळतील, त्या सर्व जागांवर विजय संपादन करण्याचा निर्धारही संवाद यात्रेच्या समारोपातून करण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला नसला तरी हालचाली मात्र त्याच दिशेने सुरु आहे.
भाजप टार्गेट, महागाई, बेरोजगारीच्या मुद्यांवर आंदोलनाचे संकेत


2024 च्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपला राष्ट्रवादीकडून टार्गेट केले जात आहे. जातीयवादाच्या मुद्यावरून भाजपला कोंडीत पकडून पुरोगामी महाराष्ट्रात धर्मांधांना थारा नाही हा संदेश जनमाणसात पोहोचवण्याचा राष्ट्रवादीचा प्रमुख अजेंडा असेल. तसेच पेट्रोल, डिझेल, घरगती गॅस सिलिंडर, कडधान्यासह इतर जिवनावश्यक वस्तूंचे भरमसाठ वाढलेले दर, बेरोजगारी, काँग्रेस आघाडीच्या काळात असलेला महागाई दर आणि त्या तुलनेत भाजप सरकारच्या काळातील महागाई दर याचा तुलनात्मक तक्ता राष्ट्रवादीकडून जनतेसमोर मांडला जाणार आहे. महागाईविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची रणनितीही राष्ट्रवादीने आखली असल्याचे संकल्प सभेत निश्चित झाले.

राष्ट्रवादीकडे स्टार प्रचारकांची फौज तयार
राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अमोल कोल्हे, अमोल मिटकरी, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आदी प्रमुख स्टार प्रचारकांची फौज आहे. या वक्त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहचवून विरोधकांच्या वर्मावर बोट ठेवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसकडून आगामी काळात केले जाणार आहे.

Related Stories

अखेर ‘त्या’ अंध कॅलेंडर विक्रतेच्या मृत्यू

Amit Kulkarni

कोरोना लढ्यासाठी राज्यभरात ‘फिव्हर क्लिनिक्स’ सुरू करणार : उध्दव ठाकरे

prashant_c

अर्जुना प्रकल्पाच्या बंदिस्त नाल्याच्या कामामुळे शेतकऱयांचे नुकसान

Patil_p

महाराष्ट्र : मागील 24 तासात 127 पोलिसांना कोरोनाची बाधा

Rohan_P

सातारा : ३४ बळी, ७०८ कोरोनाबाधित, ५०० मुक्त

Abhijeet Shinde

लायन्स क्लब ऑफ बेळगावतर्फे विद्यार्थ्यांना मास्क

Patil_p
error: Content is protected !!