पुणे : डोळ्यात देशसेवेची भावी स्वप्ने घेऊन तीन वर्षांचे पूर्ण केलेले खडतर प्रशिक्षण…भावी आव्हानांना पेलण्यासाठी चेह-यावर झळकणारा आत्मविश्वास..लष्करी बँड पथकाच्या कदम कदम बढायेजा…विजय भारत…सारे जहासे अच्छा या गाण्यांच्या तालावर शिस्तबद्ध संचलन अशा दिमाखदार वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा 142 व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा प्रबोधिनीच्या खेत्रपाल परेड ग्राऊंडवर सोमवारी सकाळी उत्साहात पार पडला. जल्लोषात पार पडलेल्या या संचलनाने उपस्थिस्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. याच बरोभर आपल्या पाल्याला अधिकारी झाल्याचे पाहून पालकांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या.
हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी हे या सोहळ्याचे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी , एनडीएचे कमांडन्ट लेफ्टनंट जनरल संजीव डोगरा, हाईस अॅडमिरल अजय कोचर, दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जयसिंग नैन हे यावेळी उपस्थित होते. एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी दिक्षांत संचलन सोहळ्याची पाहणी केली. भावी अधिका-यांचा गणवेश, त्यांची शिस्त आणि आत्मविश्वासाचे कौतूक करत कॅडेट्सने यांनी दिलेली मानवंदना चौधरी यांनी स्विकारली. पहाटे ‘एनडीए’ कैडेट्सने संचलनाचा सराव सुरु केला होता. बरोबर सकाळी 6.45 ला खेत्रपाल मैदानाचा दरवाजा उघडला आणि कॅडेटच्या घोषनांनी मैदान दुमदुमले. पांढ-या शुभ्र गणवेशात असलेल्या एनडीएच्या कॅडेट्सनी शिस्तबद्ध पद्धतीने संचलन झाले. संचलन बघण्यासाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षक, नातेवाईक यांच्याकडून त्यांचे हे क्षण टिपले जात होते.
142 व्या तुकडीच्या संचलनात तीन्ही वर्षांचे एकुण 907 कॅडेट्स सहभागी झाले होते. यात अंतिम वर्षांचे 342 कॅडेट पासआऊट झाले. यातील 240 छात्र लष्कराचे, 37 छात्र नौदलाचे आणि 70 छात्र हवाईदलातील होते. याशिवाय भूटान, ताजिकीस्तान, मालदिव, व्हियतनाम, मॉरिशस, अफगानिस्तान, श्रीलंका आणि म्यानमार या आठ मित्र देशांतील 19 छात्रांचाही या संचलनात समावेश होता. संचलनाचे प्रमुख पाहूणे संचलस्थळी आल्यावर लष्कराच्या तीन चेतक हेलिकॉप्टरनी त्यांना सलामी दिली.
त्यानंतर त्यांनी ओपन जीपमधून संचलन सोहळ्याची पाहणी केली. सुपर डॉमिनोज विमानांनी आकाशात झेपवात मानवंदना दिली. यानंतर कॅडेट्सच्या संचलनाला सुरुवात झाली. यानंतर चौधरी यांनी तीन उत्कृष्ट कामगीरी करणा-या कॅडेट्सना सुवर्ण, रजत आणि कांस्य पदक देऊन गौरवीले. यानंतर खेत्रपाल मैदानावरुन कॅडेट्सने अंतिम पथाकडे वाटचाल करणा-या विद्यार्थ्यांना सुखोई 30 या विमानांनी मानवंदना दिली.
दरम्यान, भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि युद्ध तंत्रज्ञान आयात करतो. परंतु रशियाचे युक्रेन सोबत युद्ध सुरु असण्याचा या आयातीवर परिणाम होणार नसल्याचे भारतीय हवाईदल प्रमुख विवेक राम चौधरी यांनी म्हटलय. त्याचबरोबर भविष्यात इतर देशांवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी भारतीय सैन्य दलाच्या भुदल, वायुदल आणि नौदल या तिन्ही विभागांकडून आत्मनिर्भर भारत धोरण स्वीकारण्यात आल्याचे चौधरी यांनी यावेळी सांगितले. धोरणाच्या अंतर्गत भारतीय सैन्याला लागणारे युद्ध साहित्य भारतीय कंपन्यांकडून तयार करून घेण्यावर भर देण्यात येणार आहे. लष्करी सामग्रीच्या खरेदीसाठी उद्योग क्षेत्रासोबत प्रत्यक्ष बोलणी आणि व्यवहार करता यावेत म्हणून भुदल, वायुदल आणि नौदलाकडून स्वतंत्र विभाग तयार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर कुठली यंत्रे इतर देशातून आयात करायची आणि कुठली करायची नाहीत याची यादी तयार करण्यात आल्याचेही चौधरी यांनी यावेळी सांगितले.