ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) अधिकृत ट्विटर हँडल शनिवारी रात्री उशिरा हॅक करण्यात आले. तांत्रिक तज्ज्ञांच्या मदतीने लवकरच हे अकाऊंट पूर्ववत केले जाईल, अशी माहिती एनडीआरएफचे डायरेक्टर जनरल अतुल करवाल यांनी आज सकाळी ट्विटद्वारे दिली.
करवाल यांनी म्हटले आहे की, अकाऊंट हॅक केल्यानंतर हॅकर्सने एनडीआरएफच्या ट्विटर हँडलवरून काही संदेश पोस्ट केले होते. त्यामुळे आगोदर या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेले संदेश दिसत नव्हते. परंतु अधिकृत डिस्प्ले आणि संघीय दलाची माहिती दिसत होती. या समस्येकडे तांत्रिक तज्ज्ञ लक्ष देत असून लवकरच हे हँडल पूर्ववत केले जाईल.
नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींचा सामना करण्यासाठी संघीय आकस्मिक दल म्हणून 2006 मध्ये एनडीआरएफची स्थापना करण्यात आली. नुकताच 19 जानेवारी रोजी एनडीआरएफने आपला 17 वा स्थापना दिवस साजरा केला.