Tarun Bharat

नाटकांकडे युवा प्रेक्षकाला खेचण्याची गरज

प्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱहाडे यांनी व्यक्त केलेले मत : ‘तू सांगशील तसं’चा 60 टक्के प्रेक्षक नवीन

प्रतिनिधी /मडगाव

कोरोना महामारीच्या काळात इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे रंगभूमीला देखील जबरदस्त तडाखा बसला. मात्र त्यातून रंगभूमी आता नुसती सावरलेली नाही, तर खूप पुढे गेलेली आहे. पण रंगभूमीच्या उज्ज्वल भविष्यासाठी नव्या पिढीला त्याकडे खेचून आणणे आवश्यक आहे. आपल्या ‘तू सांगशील तसं !’ या नाटकाला लाभलेला 60 टक्के प्रेक्षकवर्ग हा नवीन आहे, असे रंगभूमीवरील आणि दूरचित्रवाणी मालिकांतील प्रख्यात अभिनेते संकर्षण कऱहाडे यांनी ‘तरुण भारत’च्या मडगाव कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता काढले. 

शुक्रवारी मडगावच्या रवींद्र भवनात संकर्षण कऱहाडे यांनी लिहिलेल्या आणि त्यांचीच प्रमुख भूमिका असलेल्या ‘तू सांगशील तसं !’ या नाटकाचा 250 वा प्रयोग सादर करण्यात आला. त्यानिमित्ताने त्यांनी व्यवस्थापक गिरीश महाजन यांच्यासमवेत ही भेट दिली आणि नाटक, मालिका, चित्रपट याच्याशी संबंधित विविध पैलूंवर दिलखुलास चर्चा केली. ‘तरुण भारत’चे दक्षिण गोवा डेस्क प्रमुख सूरज प्रभू यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी मडगाव प्रतिनिधी सोमनाथ रायकर, कुंकळी प्रतिनिधी सुनील फातर्पेकर, ऍडव्हर्टायझिंग एक्झिक्युटिव्ह दीपक पै, मडगाव कार्यालयातील कर्मचारी अभिलाषा आमोणकर, सुदिन केंकरे, गोपाळ देसाई आणि अनुराधा नार्वेकर हजर होत्या.

नवीन ‘ओटीटी’ माध्यम सध्या चांगलेच जोर धरत असून त्याचे रंगभूमीला कितपत आव्हान जाणवत आहे असे यावेळी विचारले असता, रंगभूमीला काहीच आव्हान भेडसावत नसून ‘ओटीटी’ बघून बघून कंटाळा आल्याने आपण नाटक बघायला आलेलो आहे असे ‘तू सांगशील तसं !’ या नाटकाच्या अनेक प्रेक्षकांनी आपल्याला सांगितले आहे, अशी माहिती कऱहाडे यांनी दिली. ‘तू सांगशील तसं !’ या नाटकाची संकल्पना सूचल्यानंतर आपण पुढे लिहित गेलो. त्यात आपल्या वडिलांच्या वेळ पाळणे व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची वृत्तीही कुठे तरी डोकावून जाते. आजच्या कौटुंबिक परिस्थितीचे प्रतिबिंब असलेल्या या नाटकाशी दांपत्य, प्रेमात पडलेली व्यक्ती तसेच प्रेमात न पडलेली व्यक्ती सुद्धा सहज जोडली जाईल. एखादे नाटक असो वा अन्य कलाकृती त्याच्याशी सर्व जण जोडले जाणे आवश्यक असते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

लेखन व अभिनयामुळे जास्त आनंद

‘तू सांगशील तसं !’ या नाटकात प्रमुख भूमिका करण्याबरोबर त्याचे लेखनही संकर्षण कऱहाडे यांनी केलेले आहे. अशा प्रकारे दोन्ही जबाबदाऱया पेलण्याचे काय फायदे आहेत असे विचारले असता त्याचे फायदे व तोटे हे दोन्हीही आहेत, असे त्यांनी सांगितले. ‘त्यातून आनंद जास्त मिळतो आणि आपल्याला अभिप्रेत तसे संवाद बोलता येतात. नाटकाच्या प्रयोगासाठी रवाना होणाऱया बसमध्ये बसल्यानंतर सर्व कलाकार, तंत्रज्ञ व अन्य कर्मचारी ज्यासाठी जात आहेत त्याची मूळ प्रेरणा आपले लेखन आहे याची जाणीव सुखावून जाते’, असे ते म्हणाले. नाटकामध्ये तांत्रिक बाबी यायला हव्यात. पण त्यात समतोल हवा. अन्यथा तंत्राच्या वारेमाप वापरात मर्म व निसर्ग हरवून जातो असे आपले मत आहे, असे त्यांनी सांगितले. मराठी नाटक अजूनही विनोदाचा दर्जा टिकवून आहे, असे मतही कऱहाडे यांनी व्यक्त केले.

संकर्षण कऱहाडे हे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील समीरच्या भूमिकेतून भरपूर गाजलेले असून मालिकांवर सहसा तोचतोचपणा येत असल्याच्या वा अतिप्रमाणात त्या वाढवल्या जात असल्याची टीका होते याकडे लक्ष वेधले असता, अशा मालिकांचा 80 टक्के प्रेक्षकवर्ग हा महिलांचा असतो आणि त्यांना जे हवे त्यानुसार तसेच ‘टीआरपी’चा विचार करून या मालिका चालतात, हे त्यांनी नजरेस आणून दिले. मात्र टीव्ही मालिकांच्या भविष्याच्या दृष्टीने नवनवीन प्रयोग होणे आवश्यक आहे हे त्यांनी मान्य केले. तसे काही प्रयोग होतही आहेत. त्यापैकी काही चालतात, तर काही चालत नाहीत असे कऱहाडे पुढे म्हणाले.

Related Stories

बेपत्ता इसमाचा मृतदेह नदीत आढळला

Amit Kulkarni

भूमिपुत्र विधेयक न्यायालयात होणार रद्द

Amit Kulkarni

स्मार्ट सिटीची कामे 15 मार्चपर्यंत बंद

Amit Kulkarni

फेब्रुवारीत 21 जणांचा रस्ता अपघातात मृत्यू

Amit Kulkarni

‘गोय स्वातंत्र्याचे होमखण’ माहिती पट सीडीचे प्रकाशन

Amit Kulkarni

मायकल लोबो यांची मामलेदार कचेरीत आकस्मिक भेट

Amit Kulkarni