Tarun Bharat

एकतरी हिंदू राष्ट्र असण्याची गरज

अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात होणार विचारमंथन : रामनाथी येथे उद्यापासून 7 दिवस आयोजन

प्रतिनिधी /पणजी

हिंदू जनजागृती समिती आणि देशविदेशातील 350 पेक्षा जास्त हिंदुत्ववादी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ’अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ उद्या दि. 12 जून पासून गोव्यात प्रारंभ होत आहे. रामनाथी फोंडा येथील श्रीरामनाथ देवस्थान प्राकारात चार दिवस चालणाऱया या अधिवेशनात इस्लामी देशांच्या भारतविरोधाला उत्तर देणे तसेच जगात एकतरी हिंदू राष्ट्र असण्याची आवश्यकता या विषयांवर सखोल मंथन करण्यात येणार आहे.

शुक्रवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरू डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ही माहिती दिली. त्यावेळी व्यासपीठावर भारत माता की जय संघटनेचे गोवा संघचालक सुभाष वेलिंगकर, समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे, सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस आदींची उपस्थिती होती.

गत 10 वर्षांपासून गोव्यात होणाऱया अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामुळे देशात हिंदू राष्ट्राची चर्चा प्रारंभ झाली. त्यानुसार नंतर विविध क्षेत्रात कार्य सुरू झाले. एवढे होऊनही अल कायदा सारख्या इस्लामी संघटना आणि अन्य इस्लामी राष्ट्रे भारतविरोधी कारवाया थांबवत नाही. तरीही कुणीच त्यांना विरोध करत नसल्यामुळे आता तर शिवलिंगा सारख्या मुद्यांवरून हिंदूंना डिवचण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. त्यावरूनच जगात एकतरी हिंदू राष्ट्र असण्याची गरज निर्माण झाली आहे, असे डॉ. पिंगळे यांनी सांगितले.

यासंबंधी दिशादर्शन करण्यासाठी यंदाच्या अधिवेशनात हिंदू राष्ट्र संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनातील तीन दिवस ही संसद होणार आहे. त्याशिवाय काशी येथील ज्ञानवापी मशीद, मथुरा मुक्ती आंदोलन, प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट, मशिदींवरील भोंग्यांचे ध्वनीप्रदूषण, मंदिर संस्कृती इतिहास यांचे रक्षण, यासारख्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

अधिवेशनात अमेरिका, इंग्लंड, हाँगकाँग, सिंगापूर, नेपाळ, फिजी या देशांसह भारतातील 26 राज्यांमधील 350 पेक्षा जास्त हिंदु संघटनांचे 1000 पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यात प्रामुख्याने सीबीआयचे माजी हंगामी संचालक नागेश्वर राव, ज्ञानवापी मशिदीविरोधात लढा देणारे हरिशंकर जैन, त्यांचे सुपूत्र विष्णुशंकर जैन, भाजपचे तेलंगणा येथील आमदार टी राजासिंह, पनून काश्मिर चे राहूल कौल, अरुणाचल येथील कुरू थाई, भारत रक्षा मंचचे अनिल धीर, भारत सेवाश्रम संघाचे स्वामी संयुक्तानंदजी महाराज, इंटरनॅशनल वेदांत सोसायटीचे स्वामी निर्गुणानंदगिरी महाराज, यांच्यासह अनेक उद्योजक, वरिष्ठ अधिवक्ता, विचारवंत, लेखक, पत्रकार, मंदिर विश्वस्त तसेच सामाजिक आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती पिंगळे यांनी दिली.

श्री. वेलिंगकर यांनी बोलताना, सध्या देशात सर्वत्र हिंदूंच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. द काश्मिर फाईल्स नंतर देशात अनेक ठिकाणी दंगली आणि हिंसाचार करण्यात आला. गोव्यातही अशीच परिस्थिती निर्माण होत आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया सारख्या कट्टरपंथी संघटना याकामी सक्रीय असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे गोमंतकीयांच्या सुरक्षेसाठी आम्ही हिंदु रक्षा महाआघाडीचा अभिनव प्रयोग केला. हिंदुंचा आणखी छळ होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे ते म्हणाले.

व्यासपीठावरील अन्य मान्यवरांनीही यावेळी विचार मांडले. हिंदू जनजागृती समितीचे संकेतस्थळ, यु टय़ूब चॅनल आदी माध्यमांवरून या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून जगभरातील हिंदुत्वनिष्ठांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Related Stories

हळदोण्यात महेश साटेलकर यांची घरोघरी प्रचारास सुरुवात

Amit Kulkarni

सीएमएम अरेनामध्ये ख्रिसमसनिमित्त ऑफर

Omkar B

तरुण तेजपाल निवाडय़ाला उच्च न्यायालयात आव्हान

Amit Kulkarni

मरिनावर सरकारने येत्या दोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करावी

Amit Kulkarni

कार्निव्हल मिरवणूकीसाठी वाहतूकीत बदल

Amit Kulkarni

गोवा राज्य सहकारातील उत्कृष्ट मॉडेल बनू शकतो !

Patil_p