राज्य सरकारकडून कोरोना संसर्गासंबंधी निर्देश ः सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात सणासुदीचे दिवस असून सार्वजनिक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता गृहीत धरून आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने सार्वजनिक ठिकाणी मास्कची सक्ती केली आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत हा आदेश जारी राहणार आहे. यासंबंधीची मार्गसूची आरोग्य खात्याने सोमवारी जारी केली आहे. कोविड नियमांचे पालन होत असल्याची खातरजमा करून घ्यावी, अशी सूचनाही संबंधित आस्थापनांना करण्यात आली आहे.
जूनच्या पहिल्या आठवडय़ापासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे नागरिक मास्क वापरणे, कोविड चाचण्या करणे आणि लस घेण्याच्या बाबतीत दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे आगामी काळात कोरोना रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी, कार्यालये, निवासी संकुले इत्यादी ठिकाणी कोविड नियमावलीचे पालन करण्याबाबत खातरजमा करून घेण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्य खात्याने मार्गसूचीमध्ये म्हटले आहे.
सरकारी आणि खासगी कार्यालये, निवासी संकुले, हॉटेल्स्, क्लब, रेस्टॉरंट, पब, बार, धर्मशाळा, सिनेमागृह, शिक्षण संस्थांमध्ये (पाच वर्षाच्या आतील मुले वगळून), सार्वजनिक परिवहन व्यवस्था असणारी ठिकाणे बस, मेट्रो रेल्वे, रेल्वे, शॉपिंग मॉल आणि बाजारपेठ याठिकाणी मास्क सक्ती करावी असा आदेश देण्यात आला आहे.
सप्टेंबर 2022 पर्यंत विविध सण असून या काळात लोक गटागटाने एकत्र जमण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध उत्सव आणि सण खुल्या जागेवर साजरा करणे योग्य ठरेल. याठिकाणी प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रिनिंग व्यवस्था, सोशल डिस्टन्सिंग, हँड सॅनिटायझरचा वापर, मास्कचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे तसेच कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांना सहभागी होण्यास प्राधान्य द्यावे. कोरोनाची लक्षणे असलेल्यांचे विलगीकरण करून त्यांना योग्य उपचाराची शिफारस करावी. तसेच त्यांच्या प्राथमिक संपर्कात आलेल्यांची कोविड चाचणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
नियमांची अंमलबजावणी आवश्यक
बंदिस्त जागेतील कार्यक्रमांमध्ये मास्कची सक्ती करण्यात आली असून सार्वजनिक आरोग्य हितासाठी जारी करण्यात आलेल्या नियमांची अंमलबजावणी करावी तसेच नियमांचे पालन होत असल्याविषयी खातरजमा करावी, अशी सूचना आरोग्य खात्याने जिल्हा प्रशासनाला केली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचे आयुक्त डी. रणदीप यांनी सदर मार्गसूची जारी केली आहे.