ऑनलाईन टीम / मुंबई :
INS विक्रांत बचाव मोहिमेतील कथित घोटाळ्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यानंतर त्यांचे पूत्र नील सोमय्या (Neel Somaiya) यांनाही उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.
सोमय्या पिता-पुत्रांवर INS विक्रांत बचाव मोहिमेत कोटय़वधींचा अपहार केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर सोमय्या पिता-पुत्रांना या प्रकरणी अटक करण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. मात्र किरीट सोमय्या यांना यापूर्वीच न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता. आज उच्च न्यायालयाने त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनाही अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे. 28 एप्रिलला होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत सोमय्या पिता-पुत्रांना अटक न करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. यादरम्यान त्यांना अटक झाल्यास नील सोमय्या यांचीही 50 हजारांच्या वैयक्तिक जामीनावर त्यांची सुटका करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान, 25 ते 28 एप्रिल असे सलग चार दिवस सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत चौकशीकरता आर्थिक गुन्हे अन्वेषण कार्यालयात हजेरी लावणे नील सोमय्यांसाठी बंधनकारक असणार आहे.