Tarun Bharat

नीरज चोप्राने रचला नवा इतिहास!

डायमंड लीग सिरीजमध्ये ऐतिहासिक सुवर्ण, स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय ऍथलिट

झुरिच / वृत्तसंस्था

ऑलिम्पिक सुवर्णजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने प्रतिष्ठेची डायमंड लीग फायनल्स जिंकत गुरुवारी नवा इतिहास रचला. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ऍथलिट ठरला.

चोप्राने गुरुवारी झालेल्या या स्पर्धेत फाऊलने सुरुवात केली. मात्र, नंतर दुसऱया प्रयत्नात 88.44 मीटर्स थ्रोसह अव्वलस्थानी झेप घेतली. ही त्याच्या कारकिर्दीतील चौथी सर्वोच्च कामगिरी ठरली. याच थ्रोमुळे तो स्पर्धेतील सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. नंतर त्याने आपल्या पुढील चार थ्रोमध्ये 88.00 मीटर्स, 86.11 मीटर्स, 87.00 मीटर्स व 83.60 मीटर्स असे अंतर नोंदवले.

झेक प्रजासत्ताकचा ऑलिम्पिक रौप्यजेता जकूब व्हॅडलेचने 86.94 मीटर्सच्या सर्वोत्तम थ्रोसह दुसरे स्थान प्राप्त केले. त्याने हा थ्रो चौथ्या प्रयत्नात नोंदवला. जर्मनीचा ज्युलियन वेबर 83.73 मीटर्सच्या सर्वोत्तम थ्रोसह तिसऱया क्रमांकाचा मानकरी ठरला.

24 वर्षीय भारतीय सुपरस्टार नीरज चोप्रा आता ऑलिम्पिक चॅम्पियन, वर्ल्ड चॅम्पियनशिप रौप्यजेता आणि डायमंड लीग चॅम्पियन ठरला असून ही सर्व जेतेपदे त्याने मागील 13 महिन्यात प्राप्त केली आहेत. त्याने गतवर्षी 7 ऑगस्ट रोजी टोकियोत ऐतिहासिक ऑलिम्पिक सुवर्ण जिंकले होते.

या हंगामात नीरजने सहा वेळा 88 मीटर्सपेक्षा अधिक अंतराचे थ्रो केले असून यात त्याने कमालीचे सातत्य राखले आहे. त्याने याच हंगामात 89.94 मीटर्सचा राष्ट्रीय विक्रम देखील नोंदवला. चोप्राने या ऐतिहासिक जेतेपदासह यंदाच्या आपल्या आंतरराष्ट्रीय हंगामाची सांगता केली. डायमंड लीग ही ऑलिम्पिक व वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या पाठोपाठ सर्वाधिक प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते.

नीरज चोप्रासाठी ही तिसरी डायमंड लीग फायनल्स ठरली. त्याने यापूर्वी 2017 व 2018 मध्ये अनुक्रमे सातवे व चौथे स्थान प्राप्त केले होते. यंदा त्याला डायमंड लीग जेतेपदाच्या चषकासह 30 हजार अमेरिकन डॉलर्सचे इनाम आणि 2023 वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप, बुडापेस्टचे वाईल्डकार्ड प्रदान करण्यात आले. नीरजने डायमंड लीगच्या लुसाने लेगमध्ये 85.20 मीटर्सचा क्वॉलिफाईंग मार्क पार करत वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी यापूर्वीच पात्रता मिळवली आहे.

डायमंड लीगमध्ये चॅम्पियनशिप स्टाईल मॉडेलने 32 डायमंड डीसिप्लिन्सचा समावेश असतो. ऍथलिट्सना 13 सिरीज-मीटच्या माध्यमातून गुण बहाल केले जातात आणि त्या निकषावर त्यांना फायनलमध्ये पात्रता मिळवता येते. चोप्राने यंदा दि. 26 ऑगस्ट रोजी डायमंड लीग सिरीजमधील लुसाने लेगमध्ये उत्तम पुनरागमन केले होते. लुसाने येथेही त्याने 89.08 मीटर्सचा कारकिर्दीतील तिसरा सर्वोत्तम थ्रो करत टायटल जिंकले होते.

नीरजला पुढे 28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत संपन्न झालेल्या बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत धोंडशिरेच्या किरकोळ दुखापतीमुळे सहभागी होता आले नव्हते. जुलैमध्ये अमेरिकेत संपन्न झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य जिंकताना त्याला सदर दुखापत झाली होती. शुक्रवारी झुरिचमध्ये संपन्न झालेल्या फायनल्समध्ये 6 ऍथलिट्समध्ये ग्रेनाडाचा वर्ल्ड चॅम्पियन अँडरसन पीटर्स दुखापतीमुळे सहभागी होऊ शकला नाही. गुरुवारी मिळवलेल्या विजयासह चोप्राने कारकिर्दीत पाचव्यांदा व्हॅडलेचला मात दिली आहे. यापूर्वी चोप्राने पाओ नूर्मी गेम्स (14 जून) व स्टॉकहोम डायमंड लीग (30 जून) स्पर्धेत दुसरे स्थान मिळवले, त्यावेळी व्हॅडलेच अनुक्रमे सहाव्या व चौथ्या स्थानी होता. चोप्राने पुढे युगेन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य जिंकले तर त्या स्पर्धेत व्हॅडलेच कांस्यपदकाचा मानकरी ठरला होता.

कोट्स

प्रतिष्ठेची डायमंड लीग स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय ठरत नीरजने नवा इतिहास रचला, याबद्दल त्याचे खास अभिनंदन. समर्पण व सातत्य वाखाणण्याजोगे आहे. त्याचे सातत्य भारतीय ऍथलेटिक्सची एकंदरीत प्रगती अधोरेखित करणारे आहे.

-पंतप्रधान नरेंद्र मोदी

नीरजने ऍथलेटिक्समध्ये भारतीय क्रीडा क्षेत्राला सातत्याने नवी उंची प्राप्त करुन दिली असून याबद्दल आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. केंदीय क्रीडा मंत्रालय नीरजला या प्रवासात सहाय्य करत असल्याचा आनंद वाटतो. नीरजचे डायमंड लीगमधील कामगिरीबाबत खास अभिनंदन.

-केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर

नीरजच्या राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागाबाबत साशंकता

सुपरस्टार नीरज चोप्राने झुरिच लेगमध्ये सुवर्ण जिंकत आपल्या आंतरराष्ट्रीय हंगामाची जोरदार सांगता केली. मात्र, तो यानंतर आगामी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार का, याबाबत साशंकता आहे. ‘मी नुकताच धोंडशिरेच्या दुखापतीतून सावरलो आहे आणि राष्ट्रीय स्पर्धांसाठी फक्त एक-दोन आठवडेच मिळतील. त्यामुळे, यंदा यात सहभागी होण्याची शक्यता कमी आहे’, असे तो म्हणाला. यंदाची राष्ट्रीय स्पर्धा दि. 29 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत होत आहे.

नीरजच्या घरी आनंदोत्सव

सोनिपत-हरियाणा ः ऑलिम्पिक सुवर्णजेत्या नीरजने गुरुवारी झुरिचमध्ये ऐतिहासिक डायमंड लीग सुवर्ण जिंकल्यानंतर त्याच्या घरीही याचा आनंद अगदी थाटात साजरा करण्यात आला. नीरजच्या आई सरोज चोप्रा यांनी नीरजकडून खेळावर बरीच मेहनत घेणे अपेक्षित असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, मागील 12-13 दिवस मी त्याच्याशी फोनवर बोलू शकलेले नाही. त्यामुळे, तो भारतात केव्हा परत येईल, याची मला कल्पना नाही. मात्र, दुखापतीवर मात करुन तो डायमंड लीगसाठी वेळीच तंदुरुस्त ठरला, याचा आनंद आहे’.

Related Stories

माजी टेबलटेनिसपटू व्ही. चंद्रशेखर यांचे कोरोनाने निधन

Patil_p

अंकिता, दिविज शरण यांचे ‘अर्जुन’साठी नामांकन होणार

Patil_p

दिल्ली क्रिकेट संघटनेचा कारभार हंगामी समितीकडे

Patil_p

होय! 9 बॅट घेऊन ‘तो’ आयपीएल खेळतोय!

Patil_p

रियल माद्रिदकडे सुपर कप

Patil_p

अफगाणचा बांगलादेशवर विजय

Patil_p