वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप : तिहेरी उडीत अंतिम फेरी गाठणारा एल्डहोस पॉल पहिला भारतीय
वृत्तसंस्था /युजीन, अमेरिका
ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू भारताच्या नीरज चोप्राने वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये प्रथमच अंतिम फेरी गाठली. त्याने पात्रता फेरीतील पहिल्याच प्रयत्नात 88.39 मी. अंतर नोंदवत थेट पात्रता मिळविली. त्याचाच सहकारी रोहित यादवनेही अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली. पुरुषांच्या तिहेरी उडीमध्ये अंतिम फेरी गाठणारा एल्डहोस पॉल हा पहिला भारतीय ऍथलीट बनला आहे.
जेतेपदाचा दावेदार असलेल्या 24 वर्षीय नीरज चोप्राने गट अ पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात 88.39 मी. भालाफेक केली. कारकिर्दीतील त्याची ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 7.05 वाजता अंतिम फेरीला सुरुवात होईल. 83.50 मी. अंतर पार करणारे किंवा दोन गटातील सर्वोत्तम प्रदर्शन करणारे पहिले 12 खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात.
चोप्राची 89.94 मी. ही सर्वोत्तम कामगिरी असून त्याने लंडनमध्ये झालेल्या 2017 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही अंतिम फेरी गाठण्याच्या आशेने भाग घेतला होता. पण त्यावेळी त्याने 82.26 मी. अंतर नोंदवल्याने तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नव्हता. दोहामध्ये झालेल्या 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तो दुखापतीमुळे सहभागी झाला नव्हता.
गट ब मधील पात्रता फेरीत रोहित यादवने शानदार भालाफेक करीत अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली. त्याने 80.42 मी. अंतर भालाफेक करीत गटात सहावे व एकंदर 11 वे स्थान मिळविले. त्यामुळे 12 जणांच्या अंतिम फेरीत त्याला स्थान मिळाले. चोप्रा व रोहित यांच्याआधी दविंदर सिंग कांग या एकमेव भारतीय खेळाडूने यापूर्वी या स्पर्धेत अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली होती.
विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन गेनाडाच्या अँडरसन पीटर्सने सर्वाधिक 89.91 मी. अंतर नोंदवत पात्र ठरलेल्या खेळाडूंत अव्वल स्थान मिळविले. पात्रतेसाठी 83.50 मी. अंतर त्याने सहजतेने पार केले. चोप्रा दुसऱया स्थानी राहिला. जर्मनीच्या ज्युलियन वेबरनेही 87.28 मी. अंतर नोंदवत गट ब मधून अंतिम फेरीत थेट प्रवेश मिळविला. पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमने 81.71 मी. भालाफेक करीत नववे स्थान मिळवून अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या त्रिनिदाद-टोबॅगोच्या केशॉर्न वॉलकॉटचे प्रदर्शन मात्र सर्वात धक्कादायक ठरले. त्याने 78.87 मी. भालाफेक करीत 16 वे स्थान मिळविल्याने अंतिम फेरीसाठी तो पात्र ठरू शकला नाही.
एल्डहोस पॉल अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविणारा पहिला भारतीय


या स्पर्धेत तिहेरी उडीत अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय ऍथलीट बनलेल्या 25 वर्षीय एल्डहोस पॉलने 16.68 मी.ची सर्वेत्तम कामगिरी नोंदवली. पात्रता फेरीत त्याने एकंदर 12 वे स्थान मिळविले. त्याने यावर्षी झालेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत 16.99 मी.ची वैयक्तिक सर्वोत्तम नोंदवली होती. प्रवीण चित्रावेल व अब्दुल्ला अबुबाकर या अन्य दोन भारतीयांना मात्र पात्रता मिळविता आली नाही. प्रवीणने 16.49 मी. अंतर नोंदवत 17 वे स्थान मिळविले तर अब्दुल्लाने 16.45 मी. अंतर नोंदवत 28 खेळाडूंत 19 वे स्थान मिळविले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण मिळविलेल्या पेड्रो पिचार्डोने 17.16 मी. अंतर नोंदवत सर्वात अव्वल स्थान मिळविले. 17.05 मी. ही अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविण्याची मर्यादा होती. फक्त पाच खेळाडू थेट प्रवेश मिळविण्यात यशस्वी ठरले.
200 मी. मध्ये शेरिका जॅक्सनला सुवर्ण


महिलांच्या 200 मी. शर्यतीत जमैकाच्या शेरिका जॅक्सनने दुसरी सर्वोत्तम वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. तिने 21.45 सेकंदात शर्यत पूर्ण केली. तिची देशवासी व 100 मी. ची चॅम्पियन शेली ऍन पेजर प्राईसने रौप्य तर ग्रेट ब्रिटनच्या विद्यमान विजेत्या दिना ऍशर स्मिथने कांस्यपदक मिळविले. प्रेजर प्राईसने चारच दिवसापूर्वी 100 मी. चे सुवर्णपदक मिळविले होते. तिचे हे एकंदर पाचवे वर्ल्ड टायटल होते.
200 मी. मध्ये अमेरिकन खेळाडूंचे क्लीन स्वीप


पुरुषांच्या 200 मी. शर्यतीत अमेरिकेने क्लीन स्वीप साधताना तीनही पदके पटकावली. त्यांचे या स्पर्धेतील हे दुसरे क्लीन स्वीप आहे. 25 वर्षीय नोह लीलेसने चमकदार कामगिरी करीत 19.31 सेकंदात शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक स्वतःकडेच राखले. 200 मी. च्या इतिहासातील ही चौथ्या क्रमांकाची सर्वात जलद वेळ आहे. फक्त युसेन बोल्ट व योहान ब्लेक यांनीच याहून जलद वेळ नोंदवली आहे. लीलेसचा सहकारी केनी बेडनारेकने 19.77 से. वेळ नोंदवत रौप्य व युवा धावपटू एरियन नाईटने 19.80 से. वेळ नोंदवत कांस्यपदक मिळविले. चार दिवसापूर्वीं 100 मी. शर्यतीतही अमेरिकेने तीनही पदके पटकावली होती.