वृत्तसंस्था/ लुसाने
विश्व ऍथलेटिक्स संघटनेने आयोजित केलेल्या डायमंड लीग आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धेतील लुसाने येथील टप्प्यामध्ये भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेक धारक नीरज चोप्राने शुक्रवारी येथे पुरुषांच्या भालाफेक प्रकारात जेतेपदासह सुवर्णपदक पटकाविले. डायमंड लीग ऍथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारा नीरज चोप्रा हा भारताचा पहिला ऍथलिट आहे.
24 वषीय नीरज चोप्राने स्नायू दुखापतीमुळे अलीकडेच झालेल्या बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली होती. गेल्या महिन्यात झालेल्या विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेत नीरजने पुरुषांच्या भालाफेकमध्ये रौप्य मिळविले होते. या स्पर्धेत त्याला स्नायू दुखापत झाली होती. लुसाने येथील स्पर्धेत त्याने पहिल्याच प्रयत्नात 89.04 मीटरचा भालाफेक करत पहिल्या स्थानासह सुवर्णपदक निश्चित केले.
हरियाणातील पानिपत येथे वास्तव्य असलेल्या नीरजने डायमंड लीग ऍथलेटिक्स स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करत नवा इतिहास घडविला. या क्रीडा प्रकारात टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणारा जेकुब व्हॅडेलेजने 85.88 मीटरचे अंतर नोंदवित दुसरे स्थान तर अमेरिकेच्या कर्टिस थॉम्पसनने 83.72 मीटरचे अंतर नोंदवित तिसरे स्थान मिळविले.
डायमंड लीग ऍथलेटिक्स स्पर्धेच्या इतिहासामध्ये भारताचा आणखी एक ऍथलिट विकास गौडाने पुरुषांच्या थाळीफेकमध्ये पहिल्या तीन ऍथलिट्समध्ये स्थान मिळविले होते. 2012 साली न्यूयॉर्कमध्ये तसेच 2014 साली दोहा येथे झालेल्या डायमंड लीग ऍथलेटिक्स स्पर्धेत गौडाने दुसरे स्थान पटकाविले होते. 2015 साली शांघाय आणि युगेनी येथे झालेल्या डायमंड लीग ऍथलेटिक्स स्पर्धेत विकास गौडाने तिसरे स्थान मिळविले होते.