वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कामगिरीवेळी झाली स्नायुदुखापत, महिनाभर विश्रांती घेण्याचा सल्ला
वृत्तसंस्था/ बर्मिंगहम
गुरुवारपासून येथे सुरू होणाऱया बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा ऍथलेटिक्समधील सुवर्णपदकाचा दावेदार असलेल्या ऑलिम्पिक सुवर्णजेत्या नीरज चोप्राने दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतल्याने भारतीय पथकाला जबरदस्त धक्का बसला आहे.
नुकत्याच झालेल्या वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरजने भालाफेकमध्ये रौप्यपदक मिळविले होते. याच स्पर्धेवेळी त्याला धोंडशिरेची दुखापत झाली. 24 वर्षीय नीरजने मागील राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक मिळविले होते. त्या कामगिरीची पुनरावृत्ती यावेळी त्याच्याकडून अपेक्षित होती. पण त्याने माघार घेतल्यामुळे गेनाडाचा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण मिळविलेला अँडरसन पीटर्स व नीरज यांच्यातील चुरस आता पहावयास मिळणार नाही. सोमवारी अमेरिकेत नीरजचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. त्याच्या धोंडशिरेची स्थिती पाहून एक महिना विश्रांती घेण्याचा सल्ला त्याला देण्यात आला असल्याचे आयओएचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी सांगितले.
‘भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने मंगळवारी सकाळी मला दूतावासामार्फत फोन करून, फिटनेसच्या समस्येमुळे आपण बर्मिंगहममध्ये सहभागी होऊ शकणार नसल्याचे कळविले. युजीनमधील वर्ल्ड ऍथलेटिक्स स्पर्धेनंतर त्याने सोमवारी एमआरआय स्कॅन केले. त्याच्या आधारावर त्याला एक महिना विश्रांती घेण्याचा सल्ला त्याच्या मेडिकल टीमने दिला आहे,’ असे मेहता यांनी स्पष्ट केले. नीरजला झालेली धोंडशिरेची दुखापत फारशी गंभीर नसली तरी सावधगिरी म्हणून त्याला महिन्याची विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे, असे त्याच्या जवळच्या सूत्राने सांगितले.
शनिवारी नीरजने भालाफेकमध्ये रौप्य जिंकत वर्ल्ड ऍथलेटिक्समध्ये पदक मिळविणारा दुसरा भारतीय होण्याचा मान मिळविला. त्याआधी 2003 मध्ये अंजू बॉबी जॉर्जने या स्पर्धेत लांब उडीमध्ये कांस्यपदक जिंकले होते. चोप्राने चौथ्या प्रयत्नात 88.13 मी. भालाफेक केल्यानंतर त्याच्या उजव्या मांडीच्या स्नायूमध्ये किंचित वेदना झाल्यानंतर दुखापत झाल्याची त्याला शंका आली आणि तपासणीत ती खरी असल्याचे दिसून आले. ‘चौथ्या प्रयत्नात फेक केली तेव्हा ती बरीच दूरवर गेली असावी, असे वाटले. त्यानंतर मला मांडीच्या स्नायूमध्ये हलक्याशा वेदना जाणवू लागल्या. मी मांडीला स्ट्रपिंगही केले. पण नंतरच्या दोन प्रयत्नात मला सर्वोत्तम फेक करता आली नाही. तपासणीनंतर त्याचे स्वरूप स्पष्ट झाल्यावर मी पुढील स्पर्धेत भाग घेण्याबाबत समजू शकेल,’ असे नीरजने रौप्य जिंकल्यानंतर शनिवारी म्हटले होते.
चोप्राला दुखापतीतून सावरण्यासाठी लागणारी मदत करण्याकरिता आपण सतत त्याच्या संपर्कात असल्याचे ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे (एएफआय) अध्यक्ष अदिले सुमरिवाला म्हणाले. ‘शंभर टक्के फिट नसल्याने राष्ट्रकुल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभावेळी आपण ध्वजधारकाची भूमिका बजावू शकणार नसल्याचे नीरजने सांगितले. शनिवारच्या स्पर्धेवेळीही तो भालाफेक करताना झगडताना दिसला होता. आम्ही त्याच्या सतत संपर्कात आहोत,’ असे सुमरिवाला यांनी पुढे सांगितले. ध्वजवाहकाबाबत बैठकीनंतर निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.