वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
क्रिकेट न्यूझीलंडने 2022-23 च्या क्रिकेट हंगामासाठी आपल्या अनेक खेळाडूंबरोबर मध्यवर्ती करार करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, विविध देशांमध्ये याच कालावधीत स्थानिक टी-20 लीग स्पर्धा होत असून या स्पर्धांमध्ये खेळण्याचा करार यापूर्वीच केल्याने अष्टपैलू जेम्स नीशमने मध्यवर्ती करार करण्यास नकार दिला आहे.
2022-23 च्या क्रिकेट हंगामासाठी शुक्रवारी क्रिकेट न्यूझीलंडने मध्यवर्ती करार केलेल्या क्रिकेटपटूंची यादी जाहीर केली आहे. न्यूझीलंडमधील अद्याप काही अन्य क्रिकेटपटूंनी मध्यवर्ती करार केलेला नाही. दरम्यान, न्यूझीलंडतर्फे विविध स्पर्धांसाठी नीशम उपलब्ध राहणार असल्याचे सांगण्यात आले. न्यूझीलंड क्रिकेट मंडळाबरोबर आपण मध्यवर्ती करार न केल्याने आपल्यावर टीका होत असल्याचे नीशमने म्हटले आहे. न्यूझीलंड क्रिकेट मंडळातर्फे करण्यात आलेल्या मध्यवर्ती करारामध्ये ब्लेअर टिकनेर आणि फिन ऍलेन यांचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच टेंट बोल्ट आणि कॉलिन ग्रॅण्डहोम यांच्यामुळे रिकाम्या झालेल्या जागा टिकनेर आणि ऍलेन यांच्या समावेशामुळे भरल्या आहेत. वेगवान गोलंदाज टिकनेरने आतापर्यंत 6 वन डे आणि 11 टी-20 सामन्यात न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले आहे. तर वेलिंग्टनच्या 23 वषीय ऍलेनने 8 वन डे आणि 13 टी-20 सामन्यात न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. न्यूझीलंडने यापूर्वी केलेल्या आयर्लंड, स्कॉटलंड आणि हॉलंडच्या हिवाळी दौऱयामध्ये टिकनेर आणि ऍलेन यांचा समावेश होता. आता न्यूझीलंडचा संघ आपल्या घरच्या भूमीवर 7 ऑक्टोबरपासून तिरंगी मालिका खेळणार असून यामध्ये पाक आणि बांगलादेश यांचा समावेश आहे.