Tarun Bharat

केंद्रीय पातळीवर महाराष्ट्राची बोलणी

सीमाप्रश्नी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा अमित शहांशी संवाद ः तणाव निवळण्यासाठी प्रयत्न सुरु

प्रतिनिधी, मुंबई, नवी दिल्ली, बेळगाव

सीमाप्रश्नावरुन मंगळवारी मोठा तणाव निर्माण झाल्यानंतरही महाराष्ट्राने समन्वयाची भूमिका सोडलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दूरध्वनीवरुन सीमाप्रश्नी सविस्तर चर्चा केल्याचे वृत्त आहे. फडणवीस यांनी याबाबत शहा यांना विनंती करताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगण्यात यावे, असे म्हटले असून ते यात लक्ष घालतील, असा विश्वास व्यक्त केला. तथापि विरोधकांनी सरकार आरोप करणे सुरूच ठेवले असून संसदेतही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अरविंद सावंत यांनी आक्रमकपणे हा मुद्दा उपस्थित केला.

गुरुवारीही वाद-प्रतिवाद सुरुच

तथापि गुरुवारीही दिवसभर याच प्रश्नावरुन जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे दिसून आले. या वादात मनसेनेही उडी घेतली आहे. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारवर तोफ डागली असून दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ले अशक्य असल्याचा आरोप केला आहे. तथापि या वक्तव्याचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांनी समाचार घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्माईंना तोंडाला आवर घालण्यास बजावले आहे.

मुख्यमंत्री शिंदेंची अमित शहांशी चर्चा

गेले आठवडाभर सुरु असणाऱया या तणावावर मार्ग काढण्याचा महाराष्ट्राचा समन्वयाचा प्रयत्न गुरुवारीही सुरुच असल्याचे स्पष्ट झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संवाद साधला आहे. याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सीमावाद सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी बांधवांना कोणाताही त्रास होऊ नये यासाठी आपण पेंद्रीय गफहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली आहे.  हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असेपर्यंत तरी दोन्ही राज्यातील कायदा व्यवस्था सुरळीत राहायला पाहिजे. दोन्ही राज्याच्या नागरिकांना त्रास होऊ नये, अशी आपण विनंती केली आहे, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

महाराष्ट्रातून जाणाऱयांना त्रास देऊ नये

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई यांच्याशीही चर्चा झाल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्राचे जे नागरिक तिकडे जात आहेत त्यांना त्रास होऊ नये, असे बोम्माई यांना सांगितले आहे. तसेच ज्यांनी गैरप्रकार केला, तोडफोड केली त्यांच्यावर कारवाई करण्यासही त्यांनी मान्यता दिली आहे. महाराष्ट्राच्या बसेसची तोडफोड करणाऱयांवर कारवाई होणार असल्याचे बोम्माई म्हटले आहे. इथून पुढे अशाप्रकारच्या घटना घडणार नाही हे त्यांनीही मान्य केले आहे, असेदेखील एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्र्यांना विनंती केली आहे ःदेवेंद्र फडणवीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आपण दूरध्वनीवर चर्चा केली. सीमाप्रश्नावर अलिकडच्या काळातील संपूर्ण परिस्थिती त्यांच्यासमोर मांडलेली आहे. महाराष्ट्राच्या वाहनांवर विनाकारण हल्ले योग्य नाहीत, दोन राज्यात अशाप्रकारचे वातावरण असू नये, असे आपण त्यांना सांगितले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी माझा मंगळवारी झालेला संवाद सुद्धा त्यांच्या कानावर घातला आहे. तरी त्यांनीही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगावे, अशी विनंती आपण केंद्रीय गृहमंत्र्यांना केली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आणि शहा त्यात निश्चितपणे लक्ष घालतील, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

राज ठाकरेंचे बोम्माईंना पत्र

कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी तोंडाला आवर घालावा आणि महाराष्ट्राच्या गाडय़ांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार तत्काळ थांबवावेत, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्राद्वारे केली आहे. राज ठाकरेंनी त्यांचे पत्र ट्विटरवर शेअर करत सीमाप्रश्नाच्या वादात उडी घेतली आहे. राज यांनी केंद्र सरकारनेही यामध्ये लक्ष घालण्याचे आवाहन केले. समोरुन संघर्षाची कृती केली जात असेल तर आमचे उत्तर तितकेच तीव्र असेल, असे बजावताना हा वाद उफाळून यावा म्हणून कोण खतपाणी घालत आहे, हे सरकारने पहायला हवे, असेही सुचवले आहे. तसेच महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटे पिरगळावीत, असे म्हटले आहे.

दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय महाराष्ट्रावर हल्ले अशक्य ः संजय राऊत

सीमाप्रश्नाचा वाद न्यायालयात असताना कर्नाटकात महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला करणे, वाहने अडवणे असे दुःसाहस दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय होऊ शकत नाही, असे आक्रमक ट्विट करत संजय राऊत यांनी पेंद्र सरकारला लक्ष्य केले.  महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरू झाला आहे. बेळगावातील हल्ले त्याच कटाचा भाग आहे. ऊठ मराठय़ा ऊठ!, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

शंभूराज देसाई यांचे सडेतोड उत्तर

केवळ सामाजिक वातावरण बिघडू नये म्हणून बेळगाव दौरा रद्द करणाऱया शिंदे फडणवीस सरकारवर टीका करणाऱया संजय राऊत यांना सडेतोड उत्तर शंभूराज देसाई यांनी दिले. शिवाय राऊत तोंड आवरा, पुन्हा आराम करायची वेळ येऊ नये, असा इशाराच दिला. तसेच त्यांच्या शब्दांचा निषेधही केला.

राऊतांवर इतर कैद्यांचा प्रभाव ः बावनकुळे

शिंदे सरकार  नामर्द असल्याची भाषा संजय राऊतांना शोभत असून जेलमध्ये राहिल्याने इतर कैद्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला असावा. ठाकरे सरकारने अडीच वर्षात हा मुद्दा का सोडवला नाही, असा प्रश्नही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. सकाळी येऊन वाईट बोलणे एवढेच काम सध्या त्यांना आहे, सरकार संयमाने काम करत आहेत. त्यामुळे राऊतांनी आव्हान देऊ नये. राज्याचे राजकीय वातावरण खराब करू नये, असेही ते म्हणाले.

सीमावादाचे संसदेत पडसाद

सीमावादाचे पडसाद बुधवारी संसदेत उमटले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी संसदेत मुद्दा मांडला. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचे सांगितले. मात्र, हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने या मुद्दय़ावर चर्चा होऊ नये, असा प्रतिवाद कर्नाटकचे खासदार शिवकुमार चनबसप्पा उदासी यांनी केला. सभापती ओम बिर्ला यांनीही दोन राज्यांतील हा प्रश्न असल्याने याची नोंद होत नसल्याचे सांगितले.

सुप्रिया सुळे यांनी आक्रमक शैलीमध्ये सीमाप्रश्नाचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला. दहा दिवसांपासून महाराष्ट्रात सीमावाद तापला आहे. मंगळवारी सीमेवर महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक करण्यात आली. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राविरोधात काहीही बरळत आहेत. 10 दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात षडयंत्र रचले जात आहे. महाराष्ट्र तोडण्याची भाषा कर्नाटकचे मुख्यमंत्री करत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राविरोधात बोलतात. हा देश एक आहे. अमित शहांना विनंती करते की त्यांनी काही बोलावे, असेही सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले.

तथापि हे प्रकरण दोन्ही राज्यातील असल्याने यात केंद्र काहीच करू शकत नाही. हा संवेदनशील विषय आहे. त्यामुळे सीमावादाप्रश्नी कोणत्याच वाक्याची नोंद घेतली जात नसल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली. मात्र अधिवेशनातील पहिलाच दिवस सीमाप्रश्नावरील चर्चेमुळे गाजला.

Related Stories

पाचवी, आठवी बोर्डाच्या परीक्षेला ‘सर्वोच्च’ आव्हान

Patil_p

विशाखापट्टणममध्ये तीनमजली इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू

Amit Kulkarni

”कोरोनाच्या नव्या विषाणुमुळे येणारे वर्ष ही असुरक्षित”

Archana Banage

उत्तर प्रदेश विधानसभा उपाध्यक्षपदी नितीन अग्रवाल

Patil_p

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची वेबसाईट हॅक

Patil_p

2 फिटनेस टेस्टमध्ये फेल, कार थेट भंगारात

Patil_p