10 लाखांच्या बोलीवर यूपी योद्धासाठी करारबद्ध;
निहाल सावळ देसाई
प्रो. लीग कबड्डी स्पर्धेत खेळणारा नेहाल सावळ देसाई हा गोव्याचा पहिला प्रोफेशनल कबड्डीपटू बनला आहे. काल मुंबईत एका पंचतारांकीत हॉटेलात झालेल्या प्रो. कबड्डी स्पर्धेसाठीच्या खेळाडू लिलावात पेडणेच्या 24 वर्षीय नेहालला यूपी यौद्धा या प्रो. कबड्डी संघाने 10 लाखांच्या बोलीवर खरेदी केले.
पेडणेच्या आदर्श युवक संघाच्या या खेळाडूला आपल्या संघात घेण्यासाठी अन्य संघही उत्सूक होते. मात्र शेवटी यूपी यौद्धाने नेहालला आपल्या संघात घेतले. सावळवाडा येथील नेहालने शालेय, महाविद्यालयीन आणि राष्ट्रीय स्पर्धेतही आपल्या चतुरस्त्र आणि आक्रमक खेळाने छाप पाडली होती. ‘रेडर’ या महत्त्वपूर्ण स्थानावर खेळणाऱया नेहालचा खेळ हल्लीच हरियाणात झालेल्या राष्ट्रीय सीनियर कबड्डी स्पर्धेत बहरला आणि त्याच्या या खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
गोवा कब् ाड्डी संघटनेच्या चेअरमन रुक्मिणी कामत आणि गोवा राज्य कबड्डीचे सर्वेसर्वा बाबू कामतने दिलेले सहकार्य आणि मार्गदर्शनामुळे नेहाल आता खऱया अर्थाने प्रोफेशनल कबड्डीपटू बनला आहे. हल्लीच गोव्याने हरियाणात राष्ट्रीय सीनियर कबड्डी स्पर्धेत जो संघ पाठविला होता त्या संघाला मेरठच्या यूपी योध्दाच्या कबड्डी अकादमीत प्रशिक्षणासाठी स्वःता खर्च करून गोवा कबड्डी संघटनेच्या चेअरमन रुक्मिणी कामत यांनी पाठविले होते. तिथे जसवीर सिंग या अनुभवी प्रशिक्षकाचे प्रशिक्षण निहालला मिळाले.
22 दिवशीय प्रशिक्षण शिबिर मोलाचे ठरले
मला जसवीर सिंग सरांचे मार्गदर्शन मिळाले. प्रोफेशनल कबड्डी म्हणजे काय हे आम्हाला त्यांच्या प्रशिक्षणाने समजले. ते खूपच अनुभवी प्रशिक्षक आहेत. तिथे झालेल्या 22 दिवसांचे प्रशिक्षण शिबिर माझ्यासाठी खूपच मोलाचे ठरले, असे पेडणच्या भगवती हायस्कूल. हरमलच्या हरमल पंचक्रोशी हायस्कूल आणि म्हापसाच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेला नेहाल सावळ देसाई म्हणाला.
सराव सामनेही उपयोगी पडले
प्रोफेशनल कबड्डीपटू बनायचे असेल तर शारीरिक तंदुरूस्ती तसेच सामन्यावेळी खेळाची स्थिती समजणे अतिआवश्यक आहे. जसवीर सिंग सरांनी आम्हाला आघाडी असताना बचावात्मक खेळ कसा करावा आणि पिछाडीवर असताना आक्रमकता कशी दाखवावी हे पटवून दिले. यूपी योद्धा कबड्डी अकादमीतील सराव तसेच खेळण्यासाठी मिळालेले सराव सामनेही मला उपयोगी पडले, असे निहाल सावळ देसाई म्हणाला. आपले प्रशिक्षक योगेश सावळ देसाई यांचेही आभार मानायला नेहाल सावळ देसाई विसरला नाही.