96 लाखांमध्ये करता येणार 6 तासांचा अंतराळ प्रवास
अंतराळाची सैर करण्याची इच्छा अनेकांची आहे. त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक कंपन्या प्रयोग करत आहेत. अलिकडेच अमेरिकेच्या स्पेस पर्सपेक्टिव्ह कंपनीने एक असे अंतराळयान तयार केले आहे, जे लोकांना अंतराळात 6 तासांची सैर करण्याची संधी देईल. या अंतराळयानाला नेपच्यून नाव देण्यात आले आहे.
2024 च्या अखेरीस प्रवास
स्पेस पर्सपेक्टिव्हच्या अधिकृत वेबसाइटनुसार अंतराळप्रेमी 2024 च्या अखेरपासून या प्रवासाचा आनंद घेऊ शकतील. प्रवासी अंतराळात पोहोचताच पृथ्वी तसेच ताऱयांना 360 अंश कोनातून पाहू शकतील. हे सर्व नेपच्यून स्पेसशिप नावाच्या स्पेस बलूनमध्ये बसून शक्य होणार आहे. सध्या कंपनी लोकांना स्पेसशिपची व्हर्च्युअल टूर देखील देतेय.
आलिशान प्रवास
नेपच्यून स्पेसशिपच्या एका सीटची किंमत 1 लाख 25 डॉलर्स म्हणजेच सुमारे 95 लाख 75 हजार रुपये आहे. स्पेस पर्सपेक्टिव्ह याचे लाँचिंग 2024 च्या अखेरीस केनेडी स्पेस सेंटर फ्लोरिडामधून करू इच्छित आहे. कंपनीने स्पेसशिपची छायाचित्रे प्रसारित केली असून यात लक्झरी लाउंज, खूर्ची, टेबल, काउच आणि कॉकटेल मेन्यू दिसून येतो. तसच स्पेसशिपचे बाथरुमही शानदार आहे. नेपच्यूनमध्ये टेलिस्कोप, इंटरॅक्टिव्ह स्क्रीन्स आणि वाय-फाय कनेक्शन यासारख्या हायटेक सुविधा असतील.
कार्बन न्यूट्रल स्पेसशिप
कंपनीनुसार नेपच्यून हे जगातील पहिले कार्बन न्यूट्रल स्पेसशिप आहे. याचे इंटीरियर तयार करताना शाश्वत सामग्रीचा वापर करण्यात आला आहे. स्पेसशिप रिसायकल्ड मटेरियलने तयार करण्यात आले आहे. नेपच्यून समुद्रसपाटीपासून 30 मैलाच्या (48.2 किलोमीटर) उंचीपर्यंत पोहोचू शकते. याच्या प्रवाशांना अंतराळात जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचे विशेष प्रशिक्षण घ्यावे लागणार नाही. कंपनीनुसार स्पेसशिपच्या पहिल्या वर्षात 25 उड्डाणांची तयारी केली जात आहे. आतापर्यंत 600 लोकांनी याचे बुकिंग केले आहे.