Tarun Bharat

कात्रणांच्या संग्रहाचा नेरुरकर यांचा ध्यास कौतुकास्पद

आमदार विजय सरदेसाई यांचे प्रतिपादन, बोर्डा येथे मान्यवरांचा सत्कार, ‘मी 103 वर्षांचा तरुण भारत बोलतोय’ हे कात्रणांचे प्रदर्शन

प्रतिनिधी / मडगाव

आजच्या डिजिटल व स्मार्टफोनच्या जमान्यात कागदी स्वरूपातील विविध मजकूर संग्रहित करून ठेवण्याचा नवनाथ नेरूरकर यांचा ध्यास व त्यामागील तपश्चर्या खरेच दाद देण्यासारखी असून पुढील पिढीसाठी ते मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केले.

‘वर्ल्ड वाईड विस्डमस् विंडो’ या संस्थेतर्फे विविध क्षेत्रांत समाजकार्य करणाऱयांचा दरवर्षी 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त सत्कार करण्यात येतो. कोविड महामारीमुळे पुढे ढकलण्यात आलेला हा कार्यक्रम 2 रोजी पार पडला. बोर्डा-फातोर्डा येथील या कार्यक्रमात सरदेसाई प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी ‘तरुण भारत’चे गोवा आवृत्ती संपादक सागर जावडेकर अध्यक्षस्थानी होते, तर वितरण विभाग व्यवस्थापक शंकर जाधव व मडगावचे प्रतिनिधी प्रसाद नागवेकर खास अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ‘मी 103 वर्षांचा तरुण भारत बोलतोय’ हे ‘तरुण भारत’मधील कात्रणांचे प्रदर्शन राहिले.

विविध दैनिकांचा संग्रह करत असताना ‘तरुण भारत’ वर्तमानपत्रातील विविध सदरांची जी कात्रणे नेरुरकर यांनी संग्रहित करून ठेवली आहेत असा संग्रह ‘तरुण भारत’कडेही नसेल, असे म्हणत सरदेसाई यांनी नेरूरकर यांच्या कार्याची स्तुती केली. शिक्षणक्षेत्राशी व आपले अन्य छंद जोपासण्याकडे समर्पित नेरूरकरसारख्या व्यक्तांकडून आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी प्रेरणा घ्यायला हवी. अलीकडे हे होताना दिसत नाही. कोणत्याही देवळात वा दर्ग्यावर जाऊन शपथ घेतली, तरी लोकप्रतिनिधींची कोणी गॅरंटी देऊ शकत नाही, असे विजय सरदेसाई पुढे म्हणाले.

नेरूरकरांचा उत्साह कौतुकास्पद : जावडेकर

नेरूरकर हे उत्साही व्यक्तिमत्त्व असून ज्या उत्साहाने ते या वयातही कात्रणे जमविण्याचा छंद जोपासत आहेत ते कौतुकास्पद आहे, असे सागर जावडेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. आमदार सरदेसाई यांच्यात एक चमक असून त्यांच्यासारखा विधानसभेत अभ्यासपूर्ण भाषण करणारा दुसरा आमदार सध्या नाही. दुर्दैवाने स्व. मनोहर पर्रीकर यांच्यानंतर गोव्याला तसा समर्थ विरोधी पक्षनेता मिळालेला नाही. मात्र सरदेसाई यांच्यात केवळ विरोधी पक्षनेते म्हणूनच नव्हे, तर सर्व भूमिकांच्या बाबतीत ती क्षमता आहे. काही बाबतीत ते पर्रीकर यांच्याही पलीकडे गेले आहेत, असे त्यांनी सांगितले. सरदेसाई यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन आवाज उठवत राहावे. विधानसभेत अभ्यासपूर्ण भाष्य करणाऱया लोकप्रतिनिधींची गरज आहे, असे जावडेकर म्हणाले.

मान्यवरांचा सत्कार

यावेळी रामदास केळकर (माजी प्राचार्य, सप्तेश्वर हायर सेकंडरी स्कूल, मांद्रे-पेडणे), विनोद जांबावलीकर (माजी सुपरवायझर,सार्वजनिक बांधकाम खाते, केपे.), शैलेशचंद्र रायकर (माजी न्यूज रिडर, गोवा आकाशवाणी केंद्र पणजी तथा लेखक व माजी शिक्षक), गायत्री लवू गावस देसाई (साहाय्यक शिक्षिका, सरकारी माध्यमिक विद्यालय, मळकर्णे-सांगे) यांचा आमदार सरदेसाई, जावडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अन्य दोन सत्कारमूर्ती कृष्णानंद भट (समाजसेवक, बोर्डा-मडगाव) व राजेश नाईक (वाहतूक खात्याचे सहाय्यक संचालक, वास्को) हे पोहोचू शकले नाहीत. त्यांना सत्कार मागाहून पोहोचता केला जाईल असे सांगण्यात आले.

सत्कारमूर्तींच्या वतीने मनोगत व्यक्त करताना रायकर यांनी आपण नेहमी कष्ट करणे हे ध्येय मानले आणि जे मिळेल त्यात समाधान मानले असे सांगितले. नेरूरकर यांनी हा सत्कार म्हणजे संबंधित व्यक्तींमधील सुप्त गुणांची घेतलेली दखल असल्याचे स्पष्ट केले. आपल्याला कोविड काळात ‘तरुण भारत’ची कात्रणे नीट संग्रहित करण्यासाठी वेळ मिळाला, असे त्यांनी सांगितले.

‘तरुण भारत’च्या कात्रणांचे प्रदर्शन

यानिमित्ताने मांडलेल्या ‘मी 103 वर्षांचा तरुण भारत बोलतोय’ या विविध अंगी, विविध ढंगी कात्रणांच्या संग्रहात गोव्याची फुले, फळे व भाज्या, गोव्याच्या देव-देवता व देवस्थान, ‘तरुण भारत’मधील निरनिराळी आगळी वेगळी मुखपृष्ठ, तरुणांतून ‘तरुणाई दर्शन’, खजानाच्या अंतरी ‘अनंत खजाने’, ‘सावधान’ लपून वाचाल तरच वाचा ‘चुटके’चोर ‘लेले’, बोध घ्यायचा असेल तरच वाचा ‘बोधकथा’, आठवडय़ातील अनेक अनोखी सदरे, चित्रविचित्र, ‘जग दिसतं तस नसतं म्हणून माणूस फसतं’, रेशमी चिमटे शि. वि. (शिक्षक-विद्यार्थी) शिक्षक : बाळू तुला कोण काढतो चिमटे ? बाळू : जगदीश कुंटे सर, 2017 ते 2021 पर्यंत सार्वजनिक गणेशोत्सवांतील गोव्यातील ‘मंगलमूर्ती’ मोरया दर्शन, ‘फिरकी’ मारायला शिका ‘काशी’, करिअर मार्गदर्शन : प्राचार्य रामदास केळकर यांचा समावेश राहिला. या कात्रणांचे संग्राहक व रचनाकृतीकार नवनाथ नेरूरकर यांनी केलेला हा प्रकल्प आज 3 जूनपर्यंत संध्याकाळी 4 ते रात्री 8 दरम्यान खुला राहील. सर्वांनी आपल्या निवासस्थानी भेट द्यावी व या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. हे प्रदर्शन ‘निसर्ग’, 2993 सीडी फ्लॉवर व्हॅली, बोर्डा येथे खुले आहे.

Related Stories

आजपासून मोफत पाणी

Amit Kulkarni

ठाणे-डोंगुर्ली पंचायतीमधून एकूण 23 उमेदवार रिंगणात

Amit Kulkarni

सांगे, केपे, काणकोण, धारबांदोडाच्या कृषी विकासावर भर देणार

Patil_p

आपचे गोरखनाथ केरकर यांचा कुंभारजुवे मतदारसंघात प्रचार सुरू

Amit Kulkarni

पाडव्याच्या मुहुर्तावर मगोची पुनर्बांधणी

Omkar B

जनाधार कुणाला? आज फैसला

Patil_p