वृत्तसंस्था /भुवनेश्वर
पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत नेदरलँड्सने गुरुवारी झालेल्या क गटातील सामन्यात दुबळय़ा चिलीचा 14-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या इतिहासात नेदरलँड्सने हा नवा विक्रम नोंदविला आहे. अ गटातील सामन्यात इंग्लंडने स्पेनचा 4-0 तर भारताने वेल्सचा 4-2 असा पराभव केला.
अ गटात भारत व इंग्लंड यांचे प्रत्येकी 7 गुण झाले. मात्र सरस गोलसरासरीमुळे इंग्लंडने आघाडीचे स्थान मिळवित उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळविला. भारताला आता क्रॉसओव्हर लढतीच्या मार्गे उपांत्यपूर्व फेरी गाठावी लागणार आहे. भारताला वेल्सविरुद्ध मोठय़ा फरकाने विजय मिळविण्याची गरज होती. पण ते शक्य झाले नाही.
नेदरलँड्सचा विक्रमी विजय
विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या इतिहासामध्ये 2010 साली झालेल्या स्पर्धेत हॉलंडने ऑस्ट्रेलियाचा 12-0 असा विक्रमी पराभव केला होता. हॉलंडचा हा विक्रम नेदरलँड्सने गुरुवारच्या चिलीविरुद्धच्या सामन्यात मागे टाकला आहे. या स्पर्धेत आता क गटात नेदरलँड संघाने आघाडीचे स्थान मिळवताना सलग तीन सामने जिंकत पुढील फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे.
गुरुवारच्या सामन्यात नेदरलँड्सतर्फे जेनसेन जीपने 4 गोल, कर्णधार थिएरी ब्रिंकमनने हॅट्ट्रिकसह 3 गोल, कोयन बिजेनने 2 गोल आणि डेरेक डी व्हेल्डेर, व्हॅन डेम, टेरेन्स पीटर्स, जस्टीन ब्लॉक आणि तेऊन बिन्स यांनी प्रत्येकी 1 गोल केला. नेदरलँड्ने या स्पर्धेत क गटातील पहिल्या सामन्यात मलेशियाचा 4-0 तर त्यानंतर न्यूझीलंडचा पुन्हा 4-0 अशा गोलफरकाने पराभव केला होता. प्राथमिक फेरीअखेर नेदरलँड्सने इतर संघांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे 22 गोल आतापर्यंत नोंदविले आहेत.
सामन्याचा निकाल
- हॉलंड वि. वि. चिली 14-0
- इंग्लंड वि.वि. स्पेन 4-0
- भारत वि.वि. वेल्स 4-2
आजचे सामने
- ऑस्ट्रेलिया वि. द.आफ्रिका, दु. 1
- फ्रान्स वि. अर्जेन्टिना, दु. 3 वा.
- जपान वि. बेल्जियम, सायं. 5 वा.
- द.कोरिया वि. जर्मनी, सायं. 7 वा.