Tarun Bharat

नेदरलँड्स, सेनेगल संघही बाद फेरीत

नेदरलँड्सची कतारवर 2-0 तर सेनेगलची इक्वेडोरवर 2-1 गोल्सनी मात

वृत्तसंस्था/ कतार

येथील अल बायत स्टेडियमवर झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या गट अ मधील सामन्यात नेदरलँड्सने यजमान कतारचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव करून शेवटच्या सोळा संघांत स्थान मिळविले. याच गटातील अन्य एका सामन्यात सेनेगलने इक्वेडोरचा 2-1 असा पराभव करून बाद फेरी गाठली.

नेदरलँड्सने या विजयाने गट अ मध्ये 7 गुणांसह पहिले स्थान मिळविले तर सेनेगल 6 गुणांसह दुसऱया स्थानावर राहिले. यजमान कतार संघ याआधीच स्पर्धेबाहेर पडला असून विश्वचषकाच्या 92 वर्षांच्या इतिहासात प्राथमिक फेरीतील तीनही सामने गमविणारा कतार हा पहिला यजमान संघ बनला आहे. 26 व्या मिनिटाला कॉडी गॅकपोने नेदरलँड्सचे खाते उघडले. तीन सामन्यातील त्याचा हा तिसरा गोल होता. त्यानंतर उत्तरार्धातील पाचव्या मिनिटाला प्रेन्की डी जाँगने दुसरा गोल नोंदवत ही आघाडी वाढविली आणि शेवटी याच फरकाने त्यांनी विजय नोंदवला.

गॅकपोला मेम्फिस डीपे व डॅव्ही क्लासेन यांच्याकडून पास मिळाला होता. त्याने जबरदस्त फटक्यावर हा गोल नोंदवला. 50 व्या मिनिटाला क्लासेनकडून मिळालेल्या क्रॉस पासला डीपेने जवळून जोरदार फटका लगावला होता. पण कतारचा गोलरक्षक मेशाल बारशमने तो अडविल्यानंतर परतलेल्या चेंडूवर त्वरित ताबा घेत डी जाँगने संघाचा दुसरा गोल नोंदवला. दोन्ही संघांनी नंतर अनेक प्रयत्न केले. पण त्यांना यश आले नाही. नेदरलँड्सने तिसरा गोलही नोंदवला होता. पण गोल होण्याआधी चेंडू गॅकपोच्या हाताला लागल्याचे व्हीएआरमध्ये स्पष्ट झाल्यानंतर हा गोल रद्द करण्यात आला. नेदरलँड्सने तीन वेळा विश्वचषकाचे उपविजेतेपद मिळविले असून 2014 मध्ये त्यांनी तिसरे स्थान मिळविले होते. मात्र 2018 मधील स्पर्धेसाठी ते पात्रही ठरू शकले नव्हते. कतारने मात्र विश्वचषक स्पर्धेत पदार्पण केले होते आणि यजमान असल्याने त्यांना ही संधी मिळाली आहे.

सेनेगलची इक्वेडोरवर मात

याच गटातील दोहामध्ये झालेल्या दुसऱया एका सामन्यात सेनेगलने इक्वेडोरचा 2-1 अशा फरकाने पराभव करून 2002 नंतर प्रथमच बाद फेरीत प्रवेश मिळविला. कर्णधार कॅलिडू कूलिबलीने उत्तरार्धात 70 व्या मिनिटाला नेंदवलेल्या निर्णायक गोलाच्या आधारे सेनेगलने हा विजय साकार केला आणि दुसऱयांदा या स्पर्धेची बाद फेरी गाठली. सेनेगलचा पहिला गोल पेनल्टीवर इस्माइला सारने नोंदवत आघाडी घेतली होती. पण मोइजेस कॅसेडोने गोल नोंदवून इक्वेडोरला बरोबरी साधून दिली होती. त्यानंतर तीनच मिनिटानी कूलिबलीने सेनेगलचा विजयी गोल नोंदवला. या विजयानंतर गट अ मध्ये सेनेगलने 6 गुणांसह दुसरे स्थान मिळविले.

इक्वेडोरला 2006 नंतर प्रथमच बाद फेरी गाठण्याची संधी मिळाली होती. यासाठी त्यांना हा सामना अनिर्णित ठेवण्याची गरज होती. पण त्यांची ही संधी हुकली आणि 4 गुणांसह गटात त्यांना तिसऱया स्थानावर समाधान मानावे लागले. यासामन्यासाठी सेनेगललच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यांनी सतत ड्रम्स वाजवत संघाला प्रोत्साहित केले. यापूर्वी 2002 मध्ये सेनेगलने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. सेनेगलची पुढील लढत गट ब मधील अग्रस्थानावरील संघाविरुद्ध होईल.

Related Stories

हॉकी मानांकनात भारत तिसऱया स्थानी, महिलांना नववे स्थान

Amit Kulkarni

इंग्लंड क्रिकेटपटूंवर सरावावेळी फुटबॉल खेळण्यास बंदी

Patil_p

अँडरसनचा भेदक मारा, पाक अडचणीत

Patil_p

जीव मिल्खा सिंग दुबई गोल्डन व्हिसाने सन्मानित

Patil_p

दुसऱया कसोटीसाठी बर्न्स पूर्ण तंदुरूस्त

Patil_p

हंगेरीच्या कापाससह 9जलतरणपटूंना कोरोनाची बाधा

Patil_p