वृत्तसंस्था/ रोहतक (हरियाणा)
बडोदा येथे अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनतर्फे आयोजिलेल्या पहिल्या राष्ट्रीय खुल्या मास्टर्स (वयस्करांच्या) पुरूष आणि महिलांच्या ऍथलेटिक्स स्पर्धेत 105 वर्षीय महिला रामबाई यांनी महिलांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला.
महिलांच्या 100 वर्षावरील गटात घेण्यात आलेल्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत रामबाई यांनी 45.40 सेकंदाचा कालावधी नोंदवीत प्रथम स्थान मिळविताना नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला. रामबाई यांनी या क्रीडाप्रकारात सुवर्णपदक मिळविताना 101 वर्षीय मान कौर यांनी नोंदविलेला विक्रम मोडीत काढला. या स्पर्धेत रामबाई यांनी आतापर्यंत चार सुवर्णपदके मिळविली आहेत तसेच यापूर्वी झालेल्या महाराष्ट्रातील स्पर्धेत त्यांनी पाच सुवर्णपदकांची कमाई केली होती.